खेड (प्रतिनिधी) : भारतीय स्वातंत्र्यलढ्यात शौर्याची अमिट छाप सोडणारे क्रांतिकारक हुतात्मा अनंत लक्ष्मण कान्हेरे यांच्या जयंतीनिमित्त खेड शहरात श्रद्धांजलीपर कार्यक्रम पार पडला. मंगळवार, दि. ७ जानेवारी २०२६ रोजी कान्हेरे चौकातील स्मारक स्थळी खेड शहर शिवसेनेतर्फे पुष्पहार अर्पण करून या महान क्रांतिकारकाला कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी शिवसेना शहर प्रमुख कुंदन सातपुते यांनी हुतात्मा कान्हेरे यांच्या बलिदानाबद्दल बोलताना, आजच्या पिढीने स्वातंत्र्यलढ्यातील या महत्त्वपूर्ण योगदानाची आठवण ठेवणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. त्याचबरोबर त्यांच्या विचारांनी समाजात देशभक्तीची जाणीव दृढ करण्याचे आवाहनही त्यांनी केले. या कार्यक्रमाला खेड नगरपालिकेतील शिवसेनेचे गटनेते निकेतन पाटणे, नगरसेवक स्वप्नील सैतवडेकर, नगरसेवक प्रेमल चिखले, तसेच माजी नगरसेवक अंकुश विचारे, संजय चिखले यांच्यासह शिवसेनेचे विविध पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी स्मारकस्थळी पुष्पअर्पण करून हुतात्म्यांच्या स्मृतीस अभिवादन केले आणि त्यांच्या कार्याचा गौरव करत राष्ट्रनिष्ठेची शपथ घेतली.
जयंतीनिमित्त झालेल्या या उपक्रमामुळे कान्हेरे चौकात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले. हुतात्मा कान्हेरे यांच्या साहस, त्याग आणि स्वातंत्र्यासाठीच्या अदम्य लढ्याची आठवण करून देत संपूर्ण परिसरात त्यांच्या जयघोषाचा आवाज घुमला.













