चर्मालय येथे अपघात; ट्रकची दुचाकीला धडक; गुन्हा दाखल

रत्नागिरी ः प्रतिनिधी
बेदरकारपणे ट्रक चालवून दुचाकीला धडक देत अपघात केल्याप्रकरणी ट्रक चालकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची ही घटना गुरुवार 8 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वा.कोकणनगर ते मारुतीमंदिर जाणाऱ्या रस्त्यावरील चर्मालय येथे घडली होती.
ज्ञानेश्वर कचरु गिरे (39,रा.आंबा पन्हळे ता.शाहूवाडी,जि.कोल्हापूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. गुरुवारी सायंकाळी ज्ञानेश्वर गिरे हा आपल्या ताब्यातील ट्रक (एमएच-08-डब्ल्यू-8778)मध्ये एच.पी. सिलेंडर भरुन भरधाव वेगाने परटवणे ते साळवी स्टॉप जाणाऱ्या रस्त्याने जात होता. तो चर्मालय येथील चार रस्त्यांवर आला असता त्याने बुधाजी सिताराम पवार (62,रा.कोकणनगर औदुंबर चौक,रत्नागिरी) यांच्या प्लेझर दुचाकी (एमएच-08-यु-5863) ला धडक देत अपघात केला. यात पवार यांच्या पायाला गंभिर दुखापत झाल्यामुळे त्यांना उपचारांसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या अपघात प्रकरणी शनिवार 10 जानेवारी रोजी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.