नियमित पाणीपुरवठ्यासाठी ठोस नियोजन; दोन महिन्यात काम पूर्ण होणार – सौ. तन्वी चांदोस्कर

देवगड – जामसंडे | प्रतिनिधी
दीर्घकाळापासून अनियमित पाणीपुरवठ्याला सामोरे जाणाऱ्या देवगड–जामसंडे शहराला येत्या दोन महिन्यात नियमित, स्वच्छ व एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची ठोस ग्वाही पाणीपुरवठा सभापती सौ. तन्वी चांदोस्कर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यासाठी राज्य शासनाकडून ९ कोटी २१ लाख रुपयांचा निधी मंजूर करून शहरातील जुनी पाईपलाईन बदलण्याचे काम वेगात सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मकर संक्रांतीनिमित्त शहरातील नागरिकांना व पत्रकार बांधवांना शुभेच्छा देत चांदोस्कर यांनी सांगितले की, सभापतीपदाचा कार्यभार स्वीकारून पंधरा दिवसांत पाणीपुरवठा व्यवस्थेचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे. सध्या शहराला दोन ते तीन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू असून आठवड्यात तीन दिवस पूर्ण पंपिंग व चार दिवस रात्री पंपिंग केले जात आहे.
शहरातील पाणीपुरवठ्यातील मुख्य अडचण असलेल्या जुन्या पाईपलाईनसाठी पालकमंत्री यांच्या माध्यमातून ९.२१ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. एकूण १३ कि.मी. पाईपलाईनपैकी ८ कि.मी. पाईपलाईन बदलण्याचे काम प्रस्तावित असून आतापर्यंत २०० मीटर काम पूर्ण झाले आहे. उर्वरित ७,८०० मीटरचे काम दोन महिन्यात पूर्ण होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
वेळवाडी सउया येथील ६ लाख ६७ हजार लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीच्या लाईनचे काम सुरू असून जामसंडेतील व्यापाऱ्यांचा विश्वास घेऊन हे काम केले जात आहे. ही टाकी सुरू झाल्यानंतर शहराला एक दिवसाआड नियमित पाणीपुरवठा शक्य होईल तसेच ९४ लाईनसाठी निश्चित वेळापत्रक लागू करण्यात येणार आहे.
कुपलवाडी येथील पुलाच्या कामामुळे गढूळ पाणी मिळत असल्याच्या तक्रारींची दखल घेत प्रशासकीय अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली आहे. संबंधित ठेकेदाराला सूचना देण्यात आल्या असून लवकरच बैठक घेऊन कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येणार असल्याचे चांदोस्कर यांनी सांगितले.
तसेच कुपलवाडी येथे पाणी साठवणुकीसाठी बंधारा बांधण्यात येणार असून शिरगाव–पाडाघर योजनेचे पाणी देवगड–जामसंडे शहराला देण्यासाठी आवश्यक दुरुस्ती कामे सुरू आहेत. खाकशी पाईप्स बदलल्यानंतर लवकरच या योजनेचे पाणी शहराला उपलब्ध होणार आहे.
देवगड–जामसंडे शहरात एकूण ९६६ लाईन व ३०१५ नळ कनेक्शन असून सभापती, समिती सदस्य संतोष तारी व सौ. रूचाली पाटकर, लाईनमन यांच्यासह प्रत्येक लाईनवर व प्रत्येक नळधारकांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
“नागरिकांना नियमित, स्वच्छ व पुरेसा पाणीपुरवठा देणे हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट असून प्रशासन, अधिकारी, कर्मचारी व लोकप्रतिनिधी समन्वयाने काम करत आहेत,” असे प्रतिपादन सौ. तन्वी चांदोस्कर यांनी पत्रकार परिषदेत केले. मंडळ अध्यक्ष राजा भुजबळ, नगरसेविका व समिती सभापती ऋचाली पाटकर, गटनेते शरद ठुकरुल, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर, दया पाटील  राजा वालकर उपस्थित होते