वैभववाडीत जि. प. व पं. स. निवडणूकीसाठी 40 अर्ज वैद्य : तर दोन अर्ज अवैद्य

उबाठाच्या सुनील नारकर यांचा अर्ज अवैद्य

वैभववाडी l प्रतिनिधी :      वैभववाडी तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी 40 अर्ज वैद्य ठरले आहेत. तर दोन अर्ज अवैध ठरले आहेत. येथील पंचायत समिती सभागृहात निवडणूक छानणी प्रक्रिया पार पडली. कोळपे जिल्हा परिषद मतदार संघातील उबाठा सेनेचे अधिकृत उमेदवार सुनील सदानंद नारकर यांचा अर्ज अवैद्य ठरला आहे. त्यामुळे उबाठा सेनेला मोठा धक्का बसला आहे. तर उंबर्डे पंचायत समिती गणातून मैथिली मयूर दळवी या अपक्ष उमेदवाराचा अर्ज बाद झाला आहे.

भाजपाचे कोकिसरे पंचायत समिती मतदार संघातील उमेदवार साधना सुधीर नकाशे या बिनविरोध झाल्या आहेत. तर कोळपे जिल्हा पारिषदेतही भाजपाच्या प्रमोद रावराणे यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला आहे. त्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषी वातावरण आहे. तर उबाठा पक्षामध्ये सन्नाटा पसरला आहे. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यत कोण कोण अर्ज मागे घेतात त्यानंतर चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.

गुरुवारी सकाळी 11 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी सूर्यकांत पाटील व गटविकास अधिकारी श्री पाटील यांच्या उपस्थित उमेदवारांच्या अर्जांची छानणीला सुरुवात करण्यात आली. प्रथम गट क्रमांक एक कोळपे मतदारसंघाची छाननी करण्यात आली. यावेळी सुनील नारकर यांच्या उमेदवारी अर्ज शपथपत्र विविध नमुन्यात नाही व अपूर्ण असल्यामुळे त्यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आला. या मतदारसंघात आता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा अधिकृत उमेदवार राहिलेला नाही. सुनील नारकर यांनी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी वाजत गाजत मिरवणूक काढीत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांचा अर्ज बाद झाल्यामुळे उबाठा सेनेला धक्का बसला आहे.

तर उंबर्डे पंचायत समिती मतदार संघातून अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या मैथिली मयूर दळवी ज्या अर्जातील नाव व मतदार यादीतील नाव वेगवेगळी असल्यामुळे त्यांचा अर्ज सुद्धा अवैध ठरला आहे.

तर बाकीचे ४० अर्ज वैद्य ठरले आहेत. यातील डमी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.