भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष यशवंत देव यांचे निधन

राजापूर (वार्ताहर): तालुक्यातील भू येथील प्रतिष्ठीत ग्रामस्थ व बागायतदार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक व भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष यशवंत नारायण देव (७५) यांचे शुक्रवार दि. २३ जानेवारी रोजी हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने आकस्मिक निधन झाले. त्यांचेवर शनिवारी सकाळी ८ वाजता भू येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
यशवंत देव हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते. भाजपाचे निष्ठावान कार्यकर्ते असलेल्या देव यांनी सन २००६ मध्ये भाजपाचे राजापूर तालुकाध्यक्ष म्हणून काम पाहिले होते. या काळात त्यांनी अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत ग्रामिण भागात भाजपा पक्षसंघटना बांधणीसाठी काम केले. भू गावात एक प्रतिष्ठीत बागायतदार असलेले देव हे या परिसरात बाळकाका या टोपण नावाने परिचीत होते. एक हरहुन्नरी व मितभाषी असे त्यांचे व्यक्तीमत्व होते. त्यांचा व्यवसायाच्या माध्यमातुन व पक्षाच्या माध्यमातुन तालुक्यात दांडगा संपर्क होता.
शुक्रवारी सकाळी त्यांची प्रकृती एकदम ठणठणीत होती,. गावातील अनेकांना ते सकाळी भेटले होते. मात्र दुपारी अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले व त्यातच त्यांची प्राणज्योत मालावली. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच भू परिसरासह अनेकांनी देव यांच्या निवासस्थानी धाव घेतली व देव कुटुंबीयांचे सांत्वन केले.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.