भरधाव इनोव्हाची जनरेटर व्हॅनसह मंगल कार्यालयाच्या भिंतीला धडक
सावंतवाडी | प्रतिनिधी :
सावंतवाडी येथील सालईवाडा परिसरात शनिवारी मध्यरात्री एका अल्पवयीन चालकाने आपल्या ताब्यातील कार भरधाव वेगाने चालवून भीषण अपघात घडवला. या अपघातात रस्त्याकडेला उभी असलेली जनरेटर व्हॅन आणि रवींद्र मंगल कार्यालयाच्या संरक्षक भिंतीचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन जप्त केले आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार दिनांक २४ जानेवारी रोजी रात्री १ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सालाईवाडा येथील रवींद्र मंगल कार्यालय परिसरातून एक इनोव्हा कार (क्र. MH 04 FA 4554) सावंतवाडी ते शिरोडा रोडवरून अत्यंत भरधाव वेगाने जात होती. कारवरील नियंत्रण सुटल्याने या कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टाटा २०७ डी. आय. जनरेटर व्हॅनला (क्र. MH 10 K 7727) पाठीमागून जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की, जनरेटर व्हॅनला धडकल्यानंतर ही कार थेट मंगल कार्यालयाच्या दर्शनी भागातील विटांच्या कंपाउंडच्या भिंतीवर जाऊन आदळली. या दुहेरी अपघातात दोन्ही वाहनांचे आणि मंगल कार्यालयाच्या भिंतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सुदैवाने, रात्रीची वेळ असल्याने रस्त्यावर वर्दळ नव्हती, अन्यथा मोठा अनर्थ ओढवला असता.
चालकाचा पलायन आणि पोलिसात गुन्हा दाखल
अपघातानंतर अल्पवयीन चालक घाबरून घटनास्थळावरून पळून गेला. यावेळी आरोपी क्रमांक २ आनंद मिस्त्री याने त्याला पळून जाण्यास मदत केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी अमित रवींद्र आरवारी (रा. सालाईवाडा) यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली आहे.
पोलीस तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि अपघातग्रस्त इनोव्हा कार जप्त केली. पोलीस हवालदार अनिल धुरी हे हवालदार महेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. अल्पवयीन मुलाच्या हाती गाडी सोपवणाऱ्या मालकावर आणि पळून जाण्यास मदत करणाऱ्या संशयितावर पोलीस काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.












