‘आरती’ मासिकाच्यावतीने १९ व्या विभागीय निमंत्रितांचे कवयित्री संमेलन
डॉ. पल्लवी बनसोडे भूषवणार अध्यक्षपद
सावंतवाडी । प्रतिनिधी : सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या सावंतवाडीच्या भूमीत साहित्याचा नवा दरवळ पसरणार आहे. ‘आरती’ प्रभूंच्या स्मृतिगंधाला उजाळा देत, चिंतामणी साहित्य सहयोग आणि ‘आरती’ मासिकाच्या वतीने १९ व्या विभागीय निमंत्रितांच्या कवयित्री संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ३१ जानेवारीची सांज आर.पी.डी. हायस्कूलच्या सभागृहात काव्याक्षरांनी उजळून निघणार आहे.
या संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान वसईच्या शब्दाश्रित लेखिका डॉ. पल्लवी बनसोडे भूषवणार आहेत, तर गोव्याच्या बहुआयामी साहित्यिक कालिका बापट यांच्या वाणीने या सोहळ्याचे मंगल उद्घाटन होईल.
महाराष्ट्र, गोवा अन् कर्नाटकातील प्रतिभावंत कवयित्रींच्या कवितांचा पाऊस याठिकाणी बरसणार असून, महिलांच्या सर्जनशीलतेला एक हक्काचे व्यासपीठ या संमेलनाच्या निमित्ताने मिळणार आहे.
ज्येष्ठ साहित्यिक उषा परब यांच्या मार्गदर्शनाखालील महिला समितीने या सोहळ्याची जय्यत तयारी केली आहे. ज्येष्ठ महिलांचा सन्मान आणि नवोदित लेखणीचा गौरव हे या सोहळ्याचे खास आकर्षण असेल. अक्षरांच्या या वारीत सहभागी होऊन रसिक श्रोत्यांनी काव्यानंदाचा आस्वाद घ्यावा, असे निमंत्रण आयोजकांनी दिले आहे.













