एबी फॉर्मवरून उबाठा खवटी पंचायत समिती गणातील उमेदवाराचा गंभीर आरोप

खवटी पंचायत समिती गणाच्या निवडणुकीत उबाठा पक्षात उमेदवारीच्या प्रक्रियेवरून वाद उफाळून आला आहे. पक्षाकडून उमेदवारी घोषित झाल्यानंतरही अधिकृत एबी फॉर्म देताना गैरप्रकार झाल्याचा गंभीर आरोप इच्छुक उमेदवार ऋतुजा राजेंद्र गावडे यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी पत्रकार परिषदेत संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली.
ऋतुजा गावडे यांनी सांगितले की, अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आणि अंतिम क्षणी उबाठा पक्षाच्या कार्यालयात बसणाऱ्या मनोज भोसले यांनी राजकीय डावपेच आखत, त्यांना देण्यात येणारा अधिकृत एबी फॉर्म दुसऱ्याच उमेदवाराच्या नावावर दिला. या कृतीमुळे त्यांची उमेदवारी अडचणीत आली असून हा प्रकार जाणीवपूर्वक केल्याचा आरोप त्यांनी केला.
तसेच, वापरण्यात आलेला एबी फॉर्म खोटा व बनावट असल्याचा दावा करत हा प्रकार पक्षाच्या अंतर्गत शिस्तीला आणि लोकशाही मूल्यांना तडा देणारा असल्याचे त्यांनी म्हटले. अशा पद्धतीमुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
या प्रकरणी मनोज भोसले तसेच उबाठा पक्षाच्या कार्यालयात कार्यरत असलेल्या अन्य पदाधिकाऱ्यांविरोधात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. या आरोपांमुळे खवटी पंचायत समिती गणातील राजकारण तापले असून, उबाठा पक्षाचे वरिष्ठ नेतृत्व यावर कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.