मित्र शिरगावचे आयोजन
कै. रघुनाथ कदम स्मृतीप्रित्यर्थ एकांकिका महोत्सव
शिरगाव (प्रतिनिधी) – देवगड तालुक्यातील शिरगाव येथील ‘मित्र शिरगाव’ या सामाजिक संस्थेचा २६ वा नाट्य महोत्सव रविवार, १ फेब्रुवारी २०२६ रोजी शिरगाव हायस्कूलच्या रंगमंचावर रात्री ७ ते १० या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. देवगड तालुक्यातील वळीवंडे गावचे सुपुत्र, ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक कै. श्री रघुनाथ कदम यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा एकांकिका महोत्सव आयोजित करण्यात येत आहे.
या महोत्सवात नाट्यरसिकांसाठी चार निवडक एकांकिकांचा संच सादर करण्यात येणार आहे. यामध्ये विद्या मंदिर हायस्कूल, कणकवली निर्मित पडीक (बाल एकांकिका), एस. एम. हायस्कूल, प्राथमिक विभाग, कणकवली प्रस्तुत पांडुरंग नागू आणि सावतोबाचा (बाल एकांकिका), शिरगाव हायस्कूल व मित्र शिरगाव निर्मित थोर तुझे उपकार (बाल एकांकिका) तसेच मित्र शिरगाव निर्मित आईतवार (खुला गट) या एकांकिकांचा समावेश आहे.
या कार्यक्रमासाठी प्रवेशिका २०० व १०० रुपये अशी ठेवण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक होतकरू बालकलाकारांना, शाळांना व नाट्य संस्थांना प्रोत्साहन, पाठिंबा व आशीर्वाद देण्यासाठी तसेच कै. श्री रघुनाथ कदम सर यांना आदरांजली वाहण्यासाठी सर्व नाट्यरसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे नम्र आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.











