विश्वास, माया, आणि जग पाहण्याची ऊर्जा म्हणजेच मैत्री ! आणि तिचा सोहळा म्हणजे गेट-टुगेदर !

सन १९८२/८८ च्या बॅचचा स्नेहसोहळा सहलीतून संपन्न !

फोंडाघाट/कुमार नाडकर्णी — फोंडाघाट न्यू इंग्लिश स्कूलच्या सन १९८२/८८ मधील शाळा सोबती, मित्र-मैत्रिणींनी चालू वर्षीचा स्नेहसोहळा आणि त्याचे स्वरूप सहलीमध्ये रूपांतरित करून एक वेगळाच अनुभव प्रस्थापित केला. वस्तुतः आयुष्याची ५५ वी गाठलेल्या या सर्वांना सहलीतून ऊर्जा आणि मस्ती की पाठशाला अनुभवण्याची कल्पना रोमांचित करणारी ठरली. आयुष्याच्या या वळणावर आणि ५५ व्या वर्षाच्या उंबरठ्यावर अजून अनेक जण आपल्या जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली थकलेले ! मात्र त्यांना एकत्र आणून वर्गमित्र श्रीकृष्ण नानचे आणि सहकाऱ्यांनी, अभिनव सहलीतून गेट-टुगेदर ची संकल्पना अमलात आणली. आणि सर्वांच्या मनातील शाळकरी धमाल मस्ती जिवंत केली …..

मुंबईतील आणि गावाकडील सुमारे ५५/६० मित्र-मैत्रिणी सहभागी झाल्या. गोकर्णच्या निसर्गरम्य, निरव, शांत समुद्रकिनाऱ्यापासून सहलीची सुरुवात झाली. हळदीपूर येथील वैश्य गुरुमठ, मुर्डेश्वर येथील समुद्राच्या हिंदोळ्या वरील भव्य शिवपुतळा,मुकांबिका देवीचे दर्शन, शृंगेरी मठाची शांतता, पावित्र्य, धर्मस्थळातील श्रद्धा शेवटी उडपी येथील श्रीकृष्ण मंदिरातील भाग्यविधात्याचे अनाकलनीय ऊर्जा देणारे दर्शन ! हा केवळ प्रवास अथवा पर्यटन नव्हता,तर निसर्ग, संस्कृती, इतिहास आणि श्रद्धा यांच्या सानिध्यात मैत्रीचा निखळ संगम यादगार ठरला. प्रत्येक ठिकाण अनुभवण्याबरोबर जुन्या आठवणींना उजाळा, त्यातून गप्पागोष्टी, गंमत- जंमत, हास्यकल्लोळ, फोटोसेशन विचारपूस आणि खोडकर मिमिक्री यामुळे रंगत वाढत होती …

सर्व वयाचे भान विसरून, शाळेतील विद्यार्थी झाले. शाळा ही केवळ इमारतीत नसते,तर ती आयुष्यभर सुरू राहणारी मैत्रीची पाठशाला– एक प्रक्रिया असते.हे या सहली वजा स्नेहसोहळ्यातून सिद्ध झाले. यामध्ये श्रीकृष्ण नानचे, आनंद पावस्कर, पुष्पा तिरोडकर,अशोक भुजबळ, निखिल राणे ,मीना म्हसकर ,निर्मला राणे , पपा राणे,रघुनाथ परब, मिलिंद राणे, अपूर्वा पिळणकर, राजू कुबल,आप्पा पारकर,अशोक पिळणकर, अनंत सावंत, श्रावणी राणे, प्रभा राणे, विठोबा म्हसकर,भारती पवार, राकेश राणे, सुनील नानचे आणि अन्य सहकारी सहभागी झाले. अर्थात ही सहल केवळ प्रवास न ठरता, मैत्रीचा उत्सव, आठवणींचा ठेवा आणि ऊर्जा देणारा अशा स्वगतामध्ये, स्नेह सोहळा ठरवा अशा भावनांमध्ये सर्वांनी निरोप घेतला—-