हातखंबा जि. प. गटातील राजकारण तापले

शिवसेनेच्या बंडखोरावरील कारवाईनंतर युवा सेना जिल्हाप्रमुखाचा राजीनामा

रत्नागिरी : माजी जिल्हा परिषद सदस्य व माजी समाज कल्याण सभापती परशुराम मारुती कदम यांची शिवसेनेतून हकालपट्टी झाल्यानंतर रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा जिल्हा परिषद गटातील राजकारण तापले असून पक्षांतर्गत असंतोष उफाळून येऊ लागला आहे.

या कारवाईचे पडसाद आता संघटनेत उमटू लागले असून युवा सेनेचे जिल्हाप्रमुख केदार ऊर्फ मुन्ना मधुसूदन देसाई यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत परशुराम कदम यांनी अधिकृत उमेदवाराच्या विरोधात बंडखोरी केल्याने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राहुल पंडित यांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती.
याच पार्श्वभूमीवर युवा सेना जिल्हाप्रमुख केदार ऊर्फ मुन्ना देसाई यांनी वैयक्तिक कारणांचा दाखला देत आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाप्रमुखांकडे सादर केला आहे.
परशुराम कदम हे आंच्यावरील कारवाईचे हे पडसाद असल्याचे म्हटले जात असून या निर्णयामुळे शिवसेनेतील काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढली असून असंतोष पसरला आहे असेही म्हटले जात आहे.