विद्यापीठाचा कृषी सल्ला: वाढत्या उन्हात पिकांची आणि फळबागेची अशी घ्या काळजी

रत्नागिरी: डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आणि भारत मौसम विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी जिल्ह्यासाठी आगामी पाच दिवसांचा (०७ ते ११ फेब्रुवारी २०२६) हवामान अंदाज आणि कृषी सल्ला जाहीर करण्यात आला आहे. जिल्ह्यात पुढील पाच दिवस पाऊस पडण्याची शक्यता नसून हवामान कोरडे राहील. कमाल तापमान ३२ ते ३४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याचा अंदाज असल्याने पिकांच्या व्यवस्थापनाकडे लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आंबा आणि काजू बागांचे व्यवस्थापन

वाढत्या उन्हामुळे नव्याने लागवड केलेल्या आंबा कलमांच्या खोडाची साल तडू नये, यासाठी खोडांना बोर्डो पेस्ट लावण्याचा सल्ला दिला आहेआंबा फळधारणेच्या अवस्थेत असल्यास प्रत्येक झाडाला १५ दिवसांच्या अंतराने १५० ते २०० लिटर पाणी द्यावेतसेच, फळमाशीपासून संरक्षणासाठी एकरी २ ‘फळमाशी रक्षक सापळे’ लावावेत आणि फळांवर वर्तमानपत्राच्या पिशव्यांचे आवरण घालावेकाजू पिकामध्ये ‘टी मोस्किटो बग’ आणि फुलकिडीच्या नियंत्रणासाठी लॅम्बडा सायहॅलोथ्रीन किंवा प्रोफेनोफॉसची फवारणी फायदेशीर ठरेल.

भाजीपाला आणि इतर पिके

  • भुईमूग व कडधान्ये: भुईमूग सध्या फुलोरा ते आरे सुटण्याच्या अवस्थेत आहे. या काळात पाण्याचा ताण पडल्यास उत्पादनात घट होऊ शकते, म्हणून ८-१० दिवसांनी पाणी द्यावेटिक्का व तांबेरा रोगाच्या नियंत्रणासाठी मॅन्कोझेब किंवा डिफेनकोनाझोल फवारण्याचे सुचवले आहे.

    मिरची, वांगी व टोमॅटो: या पिकांना ४ ते ५ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावेवांगी आणि टोमॅटोमधील फळ पोखरणाऱ्या अळीसाठी अनुक्रमे ‘ल्युसिल्युर’ आणि ‘हेलिल्युर’ रक्षक सापळे लावावेत.

    कलिंगड: कडक उन्हापासून वाचवण्यासाठी कलिंगडाची फळे भाताच्या पेंढ्याने झाकून घ्यावीत.

  • नारळ, सुपारी आणि मसाला पिके : नारळाच्या ५ वर्षांवरील माडांना खताची तिसरी मात्रा (५ किलो निबोळी पेंड, ७५० ग्रॅम युरिया आणि ६६७ ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश) द्यावीसुपारीला ४-५ दिवसांच्या अंतराने पाणी देणे आवश्यक आहेहळदीची पाने पिवळी पडली असल्यास काढणी करून कंद वाळत घालावेत, तर काळीमिरीचे दाणे लाल होऊ लागताच त्यांची काढणी करून प्रक्रिया करावी.

पशुधनाची काळजी : वाढत्या तापमानाचा विचार करता जनावरांना दिवसभर पुरेसे आणि स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याची सूचना करण्यात आली आहे.

अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी जवळच्या कृषी विद्यापीठ केंद्र किंवा कृषी विभागाशी संपर्क साधावा.