सुभेदार मेजर संजय सावंत यांची सेवानिवृत्ती प्रसंगी भावना
सावंतवाडी । प्रतिनिधी :”सैन्य दलातून निवृत्त होताना आज गणवेशाची कवचकुंडल उतरवावी लागत असली, तरी माझ्या आतला सैनिक आजही जिवंत आहे. शेवटच्या श्वासापर्यंत ‘राष्ट्र प्रथम’ हाच विचार जपून देशासाठी आणि समाजासाठी कार्य करत राहीन,” असा दृढ विश्वास सुभेदार मेजर संजय सावंत यांनी व्यक्त केला. कारिवडे येथे आयोजित आपल्या सेवानिवृत्ती सोहळ्यात ते बोलत होते.
भारतीय सैन्य दलाच्या ‘आर्मी एअर डिफेन्स’ विभागात सलग ३० वर्षे गौरवशाली सेवा बजावल्यानंतर सुभेदार मेजर संजय सावंत निवृत्त झाले आहेत. आपल्या कार्यकाळात त्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्या निवृत्तीनिमित्त कारिवडे ग्रामस्थ आणि माजी सैनिक संघटनेच्या वतीने एका भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
आपल्या भावना व्यक्त करताना सावंत पुढे म्हणाले की, “देशसेवेच्या ओढीने डोक्याला कफन बांधून मी सैन्यात भरती झालो होतो. या नोकरीने मला पैसा आणि मानसन्मान दिला, पण माझ्यासाठी देशसेवा सर्वोच्च होती. आज गणवेश उतरवला असला तरी, नव्या पिढीमध्ये सैनिक घडवण्यासाठी मी माझे उर्वरित आयुष्य समर्पित करणार आहे.” आपल्या यशाचे श्रेय त्यांनी ग्रामदैवत श्री कालिका देवीचा आशीर्वाद, कारिवडे गाव आणि कुटुंबाच्या भक्कम पाठिंब्याला दिले.
गावात उत्सवाचे वातावरण
सेवानिवृत्तीनंतर संजय सावंत यांचे गावात आगमन होताच ग्रामस्थांनी त्यांचे अभूतपूर्व स्वागत केले. सजवलेल्या रथातून, ढोल-ताशांच्या गजरात त्यांची मिरवणूक काढण्यात आली. ठिकठिकाणी सुवासिनींनी त्यांचे औक्षण केले. या सोहळ्यामुळे संपूर्ण कारिवडे गावात उत्साहाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले होते.
या प्रसंगी माजी प्राचार्य व्ही. बी. नाईक, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून सावंत यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या सोहळ्याला माजी सैनिक कॅ. लक्ष्मण सावंत, राजश्री सावंत, अरूणा सावंत, लता बिरोडकर, वंदना मोर्ये, सुभेदार सत्यवान सावंत, नारायण सावंत, शशिकांत सावंत, लवू पार्सेकर, रामा सावंत, स्मिता सावंत, निलेश देसाई, बुधाजी सावंत, रूपेश सावंत यांच्यासह भैरववाडी माजी सैनिक संघटना, महेंद्र ॲकॅडमी, मराठा ॲकॅडमीचे प्रतिनिधी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.













