दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल
खेड: दिलेले पैसे परत मागितल्याच्या कारणावरून दोन जणांनी एका तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना खेड तालुक्यातील मुरडे शिंदेवाडी येथे घडली आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याला वाचवण्यासाठी आलेल्या त्याच्या पत्नीलाही मारहाण करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सचिन परशुराम तत्करी (वय ३२, रा. भडगाव खोंडे) यांनी आरोपी निलेश बाबाराम खामकर याला २,००० रुपये उसने दिले होते. ६ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास सचिन हे आपले पैसे परत मागण्यासाठी निलेशच्या घरी गेले होते. मात्र, पैसे देण्यास नकार देत निलेशने सचिन यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ व दमदाटी करण्यास सुरुवात केली. हा वाद सुरू असतानाच आरोपी बाबाराम खामकर याने घरातील कोयता आणून सचिन यांच्या डोक्याच्या मागील बाजूस जोराने वार केला.
या हल्ल्यात सचिन यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्त्राव सुरू झाला. पतीला वाचवण्यासाठी त्यांची पत्नी प्रीती तत्करी पुढे सरसावल्या असता, बाबाराम खामकर याने त्यांनाही शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. या घटनेनंतर ७ फेब्रुवारी रोजी पहाटे सचिन तत्करी यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी निलेश बाबाराम खामकर आणि बाबाराम खामकर (दोन्ही रा. मुरडे शिंदेवाडी) यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२)(३) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास खेड पोलीस करत आहेत.












