१३ फेब्रुवारीपासून मैदानी चाचणीला सुरुवात
रत्नागिरी : प्रतिनिधी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील रिक्त असलेल्या १०८ शिपाई आणि चालक शिपाई पदांसाठीची बहुप्रतिक्षित भरती प्रक्रिया अखेर शुक्रवार, १३ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होत आहे. मिरजोळे एमआयडीसी येथील क्रीडा संकुल मैदानावर सकाळी ५:३० वाजल्यापासून या प्रक्रियेला प्रारंभ होईल. या भरतीसाठी जिल्हा पोलीस दलाकडे एकूण ६ हजार ४७९ अर्ज प्राप्त झाले असून, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी पत्रकार परिषदेत या नियोजनाची सविस्तर माहिती दिली.
या भरतीमध्ये पोलीस शिपाई पदासाठी १,०२७ महिला आणि ३,०८४ पुरुषांचे अर्ज आले आहेत. तसेच चालक पोलीस शिपाई पदासाठी १३४ महिला आणि २,२३४ पुरुष उमेदवारांनी दावेदारी सादर केली आहे. ही संपूर्ण प्रक्रिया १३ ते २२ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत राबवली जाणार आहे. सुरुवातीला उमेदवारांची मैदानी चाचणी घेतली जाईल आणि त्यानंतर पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा पार पडेल.
भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि निर्दोष व्हावी यासाठी पोलीस प्रशासनाने कडेकोट नियोजन केले आहे. याकामी ६० पोलीस अधिकारी आणि ५५० पोलीस अंमलदारांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. “संपूर्ण भरती प्रक्रिया नियमांच्या चौकटीत राहूनच पार पडेल, त्यामुळे उमेदवारांनी कोणत्याही प्रलोभनाला किंवा अफवांना बळी पडू नये,” असे आवाहन पोलीस अधीक्षक बगाटे यांनी केले आहे.
भरती दरम्यान उत्तेजक औषधांचे सेवन करणे किंवा ‘डमी’ उमेदवारांचा वापर करणे यांसारख्या गैरमार्गांचा अवलंब केल्यास कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. जर कोणत्याही दलालाने किंवा व्यक्तीने पैशांची मागणी केली, तर उमेदवारांनी तात्काळ रत्नागिरी पोलिसांच्या ‘सेतू’ व्हॉट्सॲप चॅटबॉट (९३७१४१५६१२) वर किंवा पोलीस अधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधावा, असे पोलीस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.












