आंबोली वनविभागाचा अभिनव उपक्रम

पारपोली येथे दोन ‘ट्री हाऊसेस’ पर्यटकांच्या सेवेत

​सावंतवाडी । प्रतिनिधी :
वन विभाग सावंतवाडी अंतर्गत येणाऱ्या आंबोली वनपरिक्षेत्रातील पारपोली गावालगत सह्याद्रीच्या कुशीत दोन वैशिष्ट्यपूर्ण ट्री हाऊसेस उभारण्यात आले आहेत. २० डिसेंबर रोजी या प्रकल्पाचे उद्घाटन झाले असून, निसर्गप्रेमी पर्यटकांकडून या उपक्रमाला मोठी पसंती मिळत आहे.

​हे ट्री हाऊसेस पूर्णतः नैसर्गिक पर्यावरणाचा समतोल राखून तयार करण्यात आले आहेत. दाट वनराई आणि शांत वातावरणामुळे पर्यटकांना येथे राहण्याचा एक वेगळा अनुभव मिळत आहे. आतापर्यंत ४० हून अधिक पर्यटकांनी येथे भेट दिली असून, यामध्ये विदेशी पर्यटकांचाही समावेश आहे. येथील स्वच्छता आणि वनविभागाच्या नियोजनाबद्दल विदेशी पर्यटकांनी समाधान व्यक्त केले आहे.

​या प्रकल्पामुळे पारपोली येथील स्थानिक ग्रामस्थांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. पर्यटकांना स्थानिक महिला बचत गटांमार्फत अस्सल कोकणी जेवण पुरवले जात आहे. तसेच ट्रेकिंग आणि गाईडच्या माध्यमातून स्थानिक तरुणांना आर्थिक लाभ होत आहे. पारपोली गाव हे फुलपाखरांसाठी प्रसिद्ध असल्याने पर्यटकांना येथे विविध प्रजातींच्या फुलपाखरांचे दर्शन घडत आहे.

​पर्यावरण संवर्धनासोबतच स्थानिकांचा विकास साधण्याच्या उद्देशाने हा इको-टूरिझम प्रकल्प राबवण्यात आला आहे. अधिकाधिक पर्यटकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन वन विभागामार्फत करण्यात आले आहे. बुकिंगसाठी पर्यटकांनी ७७७५८०६३८५ या क्रमांकावर संपर्क साधावा.