चिपळूण : महाराष्ट्र
जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर राज्यस्तरीय घरगुती शिवजयंती सजावट स्पर्धा २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दि. १९, २० व २१ फेब्रुवारी रोजी संपन्न होणार असून राज्यभरातील शिवभक्त मावळ्यांना सहभागी होण्याचे आवाहन जिजाऊ ब्रिगेडच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षा स्नेहल चव्हाण यांनी केले आहे.
या स्पर्धेसाठी ‘पावन खिंड’ किंवा ‘स्वराज्य संकल्पिका राष्ट्रमाता जिजाऊ’ या दोन विषयांपैकी कोणत्याही एका विषयावर घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती अथवा छायाचित्राचे पूजन करून सजावट करणे आवश्यक आहे. स्पर्धे अंतर्गत सजावटीचे तीन फोटो कुटुंबीय, मित्र किंवा शेजाऱ्यांसोबत काढून रत्नागिरी जिल्हाध्यक्षा स्नेहल चव्हाण यांच्याकडे पाठवायचे असून, त्यासोबत ३ मिनिटांचा व्हिडीओ सुद्धा सादर करावा लागणार आहे. स्पर्धकांनी आपला संपूर्ण पत्ता व संपर्क क्रमांकासह फोटो व व्हिडीओ व्हॉट्सअॅप क्रमांक ९३२५९८८६३८ वर पाठवायचे आहेत.
उत्कृष्ट सजावटीची पाहाणी करण्यासाठी आयोजक समितीचे सदस्य स्पर्धेच्या कालावधीत संबंधितांच्या घरी प्रत्यक्ष भेट देणार आहेत. ही स्पर्धा अ गट (५ ते १६ वयोगट) व ब गट (१७ ते ३० वयोगट) अशा दोन गटांमध्ये घेण्यात येणार असून, राज्यस्तरावर दोन्ही गटांतील एकूण आठ विजेत्यांना बक्षिसे देण्यात येणार आहेत. गुणांकन करताना विषयाची मांडणी, कौटुंबिक सहभाग, वेशभूषा, सामाजिक संदेश, प्रचार-प्रसार व मागील वर्षातील सहभाग या निकषांचा विचार केला जाणार आहे. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील, असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
स्पर्धेसाठी बक्षिसे प्रथम क्रमांक २१,००० रूपये रोख, सन्मानचिन्ह व गौरवपत्र, द्वितीय क्रमांक ११,००० रूपये रोख, सन्मानचिन्ह व गौरवपत्र, तृतीय क्रमांक ५,००० रूपये, रोख, सन्मानचिन्ह व गौरवपत्र, प्रोत्साहनपर बक्षीस २,५०० रूपये रोख, सन्मानचिन्ह व गौरवपत्र तसेच इतर प्रोत्साहनपर बक्षिसेही देण्यात येणार आहेत. शिवजयंतीच्या निमित्ताने प्रत्येक घरातून शिवरायांचा गौरव व्हावा, यासाठी सर्वांनी या घरगुती सजावट स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाध्यक्ष स्नेहल चव्हाण यांनी केले आहे. या स्पर्धेचे संयोजक तुषार देशमुख असून, राज्यस्तरीय समितीत प्रदेशाध्यक्ष सीमाताई बोके व प्रदेश उपाध्यक्ष वर्षाताई माने, जिजाऊ ब्रिगेड यांचा सहभाग आहे.












