गुहागर : रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथे एका महिलेचा आगीत भाजल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. रजनी रघुनाथ संगमेस्कर (वय ५१ वर्षे, रा. अंजनवेल) असे मृत महिलेचे नाव असून, ही घटना १७ जानेवारी २०२६ रोजी त्यांच्या राहत्या घरी घडली होती. त्या दिवशी त्या घरातील चुलीसमोर शेक घेत असताना अचानक त्यांच्या साडीने पेट घेतला. या आगीत त्यांच्या पाठीला आणि दोन्ही पायांच्या मागील बाजूस गंभीर दुखापत झाली होती. घटनेनंतर त्यांना तातडीने स्थानिक डॉक्टरांकडे प्राथमिक उपचारासाठी नेण्यात आले होते.
पुढील उपचारांसाठी त्यांना १८ जानेवारी २०२६ रोजी मुंबईतील भोईवाडा येथील के.ई.एम. रुग्णालयात (वॉर्ड क्र. १६) दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. मात्र, उपचार सुरू असतानाच ४ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ६:३० वाजताच्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात १६ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ११:१० वाजता आकस्मिक मृत्यूची नोंद (आमृ. क्रमांक ०६/२०२६) करण्यात आली असून, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये पुढील कार्यवाही सुरू आहे.












