वैभववाडी l प्रतिनिधी : एस. आर. दळवी (आय) फाउंडेशन सिंधुदुर्ग टीचर टॉक फोरम यांच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शिक्षक वर्गासाठी आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यामध्ये संतोष सिताराम वारंग, जि. प. शाळा वालावल नं 1, कुडाळ यांनी प्रथम क्रमांक पटकावला असून द्वितीय क्रमांक प्राजक्ता गोपाळ सावंत, स्व. सौ जयश्री वामन प्रभू कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय काळसे, मालवण यांनी तर तृतीय क्रमांक संतोष यशवंत मोहिते, बालभवन विद्यामंदिर मौदे, वैभववाडी यांनी पटकावला आहे. तसेच उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक शिवकन्या सुभाष सांगवे जि. प. शाळा सांगेली सावरवाड, सावंतवाडी व उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक देवयानी देवदास मेस्त्री, जि. प. पूर्ण प्राथ.शाळा दाभोली नं 1, वेंगुला यांनी मिळवला आहे.
एस. आर. दळवी (आय) फाउंडेशनच्या स्थापना दिनाचे औचित साधून शिक्षकांसाठीच्या सदर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील शिक्षकांना शैक्षणिक वर्तमान घडामोडी व आव्हाने याबाबत अभिव्यक्त होण्यासाठी ‘बदलती शिक्षण पद्धती व शिक्षकांसमोरील आव्हाने’ या विषयावर निबंधलेखन करण्यासाठी प्रेरित करण्यात आले होते. शिक्षण प्रक्रियेशी संबंधित असणाऱ्या सर्व शिक्षक वर्गासाठी अगदी अंगणवाडी पासून ते महाविद्यालयीन शिक्षकांपर्यंत सर्वांसाठी सदर स्पर्धा खुली ठेवण्यात आली होती. सदर स्पर्धेमध्ये जिल्हाभरातून तब्बल 61 निबंध प्राप्त झाले होते. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा. नागेश कदम, विठ्ठल कदम, संतोष वालावलकर व कमलेश गोसावी यांनी काम पाहिले.
या निबंध स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र तर विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, चषक व प्रमाणपत्र मार्चमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या फाउंडेशनच्या जिल्हास्तरीय गुणगौरव कार्यक्रमात वितरित करण्यात येणार आहेत.
या सर्व स्पर्धकांच्या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक रामचंद्र (आबा) दळवी, सीता दळवी, राज्याध्यक्ष महेश सावंत, जिल्हाध्यक्ष चेतन बोडेकर, उपाध्यक्ष विजय गावडे व सरचिटणीस अमर वाघमारे तसेच जिल्हा व तालुका कार्यकारणी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.










