१५ दिवसांत काम न झाल्यास ग्रामस्थांचा १ मार्च रोजी रास्ता रोको आंदोलना चा इशारा
वेंगुर्ले l प्रतिनिधी :म्हापण ते वेंगुर्ले सागरी महामार्गाची दुरवस्था झाली असून सदर रस्त्याचे डांबरीकरण येत्या १५ दिवसांत न झाल्यास १ मार्च सकाळी ९ वाजल्यापासून ग्रामस्थ व सर्वपक्षीय यांच्या वतीने म्हापण केळूस रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला लेखी निवेदना द्वारे दिला आहे. या बाबत आमदार दीपक केसरकर यांना देखील निवेदन देण्यात आले आहे.
म्हापण गावातून रेडी रेवस सागरी महामार्ग जात असून सदर महामार्गावरील म्हापण बाजारपेठ ते वेंगुर्ले या दरम्यानचा रस्ता मागील दोन वर्षांपासून अतिशय नादुरुस्त बनला आहे. या रस्त्या वरुन प्रवास करणे त्रासदायक व धोकादायक बनले आहे. सदर रस्त्याची दुरुस्तीकरणे बाबत वारंवार लेखी निवेदन देऊन तसेच प्रत्यक्ष भेटून दुरुस्तीची मागणी करुन देखील केवळ आश्वासन देण्यात आले परंतु कोणतेही रस्त्याचे काम झालेले नाही. त्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी अजूनच खराब झाला आहे. लोकप्रतिनिधी व स्थानिक ग्रामस्थ संताप व्यक्त करत आहेत. त्यामुळे येणाऱ्या १५ दिवसांत सदर रस्त्याची दुरुस्ती म्हणजे डांबरीकरण न झाल्यास येणाऱ्या १ मार्च रोजी सकाळी ९ वाजल्यापासून रास्ता रोको आंदोलन करणार असून या रास्ता रोको आंदोलन दरम्यान प्रवाशांची गैरसोय व कायदा सुव्यवस्थेचा याची जबाबदारी आपली राहिल असे निवेदनात नमुद करण्यात आले आहे.
सदर निवेदनाची प्रत उपअभियंता कार्यालय वेंगुर्ले, निवती पोलीस स्टेशन यांना देण्यात आली आहे.













