पालकमंत्री ना. नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती
विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे आयोजन
सावंतवाडी । प्रतिनिधी :
स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवाचे निमित्त साधून विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल सावंतवाडीच्या वतीने शहरात भव्य शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कोकण कॉलनी ते गांधी चौक दरम्यान काढण्यात आलेल्या भव्य रॅलीने संपूर्ण परिसर भगवामय झाला होता. पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत निघालेल्या या रॅलीने सावंतवाडीकरांचे लक्ष वेधून घेतले.
सोहळ्याच्या प्रारंभी पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषात रॅलीला सुरुवात झाली. ढोल-ताशांचा गजरात आणि भगव्या ध्वजांच्या सावलीत निघालेली ही रॅली कोकण कॉलनीतून मार्गस्थ होत गांधी चौक येथे पोहोचली.
मान्यवरांची मांदियाळी
रॅलीचा समारोप गांधी चौक येथे एका जाहीर सभेत झाला. यावेळी पश्चिम महाराष्ट्र प्रांत संयोजक नितीन महाजन, युवराज लखमराजे भोंसले, प्रभारी नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, बजरंग दलाचे कृष्णा धुळपनवर, सभापती सुधीर आडीवरेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच आनंद नेवगी, प्रतिक बांदेकर, निलम नाईक, सुकन्या टोपले, दिपाली भालेकर, दिनेश गावडे, स्वागत नाटेकर यांच्यासह मोठ्या संख्येने शिवप्रेमी आणि कार्यकर्ते या सोहळ्यात सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना वक्त्यांनी शिवरायांच्या विचारांची प्रासंगिकता आणि हिंदू संघटनाचे महत्त्व अधोरेखित केले. रॅलीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.











