अमेरिकास्थित स्वरूप भागवत यांचे राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये व्याख्यान

देवरूख (प्रतिनिधी)

संगमेश्वर तालुक्यातील आंबव येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था संचलित राजेंद्र माने अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयामध्ये “रीसेन्ट एआय ट्रेंड्स इन इंडस्ट्री” या विषयावर श्री. स्वरूप भागवत यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. सॅन फ्रान्सिस्को, कॅलीफोर्निया, अमेरिका येथील उबर कंपनीचे स्टाफ सिनिअर सॉफ्टवेअर इंजिनिअर श्री. स्वरूप भागवत यांनी महाविद्यालयाच्या कॉम्प्युटर विभागातील विद्यार्थ्यांना या विषयांवर मार्गदर्शन केले. ते मुळचे देवरुख येथील असून त्यांनी बिट्स पिलानी मधून बी. टेक. कॉम्प्युटर सायन्स चे शिक्षण पूर्ण केले. ते गेल्या सहा वर्षांपासून उबरमध्ये काम करीत असून तेथे सॉफ्टवेअर इंजिनिअर I पदापासून त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर सॉफ्टवेअर इंजिनिअर π, वरिष्ठ सॉफ्टवेअर इंजिनिअर ते सध्या स्टाफ सॉफ्टवेअर इंजिनिअर पदावर ते काम पहात आहेत.

या कार्यक्रमामध्ये सुरुवातीला प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी विभागप्रमुख प्रा. शुभांगी कांबळे तसेच विभागीय सहयोगी प्राध्यापक उपस्थित होते. श्री. स्वरूप भागवत हे देवरुख परिसरातील प्रतिभावान अभियंता असून ते जागतिक स्तरावर उल्लेखनीय प्रगती करत असल्याचे याप्रसंगी प्राचार्य म्हणाले. यानंतर श्री. स्वरूप भागवत यांनी इंडस्ट्रीमधील अलिकडच्या एआय ट्रेंड्सवर विद्यार्थ्यांशी संवाद साधला, वास्तविक जगातील एआयचे उपयोग, नवीन शोध आणि भविष्यातील संधींबद्दल मौल्यवान माहिती दिली. त्यांनी विद्यार्थ्यांना तांत्रिक मुलाखतींसाठी प्रभावीपणे तयारी कशी करावी याबद्दल मार्गदर्शन केले, मजबूत मूलभूत तत्त्वे, समस्या सोडवण्याची कौशल्ये, व्यावहारिक अनुभव आणि सतत शिक्षणाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

त्यांनी सध्याच्या उद्योग अपेक्षांशी चांगल्या प्रकारे जुळवून घेण्यासाठी अध्यापन-शिक्षण प्रक्रिया कशी मजबूत आणि आधुनिक करता येईल यावर प्राध्यापकांशीही चर्चा केली. आय टी इंडस्ट्रीमधील सध्याची परिस्थिती सांगताना ते म्हणाले विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम बरोबरच औद्योगिक क्षेत्रातील सद्यस्थितीचे ज्ञान असणे महत्वाचे आहे. त्यानुसार त्यांनी स्वतःला विकसित करणेही तितकेच गरजेचे आहे. तसेच विद्यार्थ्यांनी प्रोग्रामिंग किंवा कोडींग स्कीलच्या पलीकडे झेप घेण्याची क्षमता राखल्यास या स्पर्धेच्या जगात टिकून राहता येणे शक्य आहे. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारून आपले शंका निरसन केले. या व्याख्यानाद्वारे त्यांना इंडस्ट्रीमधील अलिकडच्या एआय ट्रेंड्सवरील ज्ञान प्राप्त झाले.