चार-पाच किमी वळसा; शालेय विद्यार्थी व कामगारांना फटका
एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात काम पूर्ण करण्याचा पीडब्ल्यूडीचा दावा
चऱ्होली खुर्द आणि चऱ्होली बुद्रुकला जोडणाऱ्या इंद्रायणी नदीवरील पुलाच्या दुरुस्तीची गती अत्यंत मंद असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. स्ट्रक्चरल ऑडिटनंतर असुरक्षित ठरल्याने डिसेंबरमध्ये पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. त्यामुळे नागरिकांना आळंदीमार्गे चार ते पाच किमीचा वळसा घालावा लागत आहे. वाहतूक कोंडीमुळे प्रवासाचा वेळ वाढून शालेय विद्यार्थी आणि कामगारांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात दुरुस्ती पूर्ण होईल, असा दावा सार्वजनिक बांधकाम विभागाने केला आहे.
पुणे : चऱ्होली खुर्द आणि चऱ्होली बुद्रुक यांना जोडणाऱ्या इंद्रायणी नदीवरील महत्त्वाच्या पुलाची दुरुस्ती अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये पूल प्रवासासाठी असुरक्षित ठरल्याने तो डिसेंबर 2025 पासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.
जून 2025 मध्ये मावळ येथे पूल कोसळून चार जणांचा मृत्यू झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने सर्व पुलांचे ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर या पुलाची तपासणी होऊन तो धोकादायक असल्याचे निष्पन्न झाले.
पूल बंद झाल्यामुळे नागरिकांना आळंदीमार्गे सुमारे चार ते पाच किलोमीटरचा वळसा घालावा लागत आहे. वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे प्रवासाचा कालावधी लक्षणीय वाढला आहे. हा पूल केवळ चऱ्होलीपुरता मर्यादित नसून पिंपरी चिंचवड परिसरातील सात ते आठ गावांसाठीही महत्त्वाचा दुवा आहे.
चऱ्होली येथील रहिवासी सागर दाभाडे यांनी सांगितले की, शालेय विद्यार्थी आणि औद्योगिक कामगारांना या परिस्थितीचा सर्वाधिक फटका बसत आहे. वडमुखवाडीतील रहिवासी वैभव तापकीर यांनी मरकळ आणि धानोरे येथे जाण्यासाठी हा सर्वात जवळचा मार्ग होता, मात्र दोन महिन्यांहून अधिक काळ उलटूनही कामात अपेक्षित प्रगती झालेली नसल्याची खंत व्यक्त केली.
स्थानिक नगरसेवक व माजी महापौर नितीन काळजे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) अधिकाऱ्यांना पत्र पाठवून दुरुस्तीचे काम प्राधान्याने पूर्ण करण्याची मागणी केली आहे. पुल बंद असल्याने रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या वाहनांच्या हालचालीत अडथळे येत असल्याचा त्यांनी दावा केला. आळंदीमार्गे वाहतूक वळविल्याने त्या मार्गावर अपघातांची संख्याही वाढल्याचे त्यांनी नमूद केले.
PWD अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, दुरुस्तीचे काम गेल्या महिन्यात सुरू झाले असून एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात ते पूर्ण होण्याची शक्यता आहे. डिझाइन मंजुरीस विलंब झाल्याने काम उशिरा सुरू झाले, तसेच काही साहित्य हैदराबाद येथे तयार करण्यात आले. प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी पथक चोवीस तास काम करत असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.









