नगराध्यक्ष माधवी बुटाला यांच्या हस्तक्षेपानंतर तातडीने काम पूर्ण
खेड (प्रतिनिधी) – खेड एस.टी. स्टॅण्ड परिसरात गटाराची पाईपलाईन चोकअप झाल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर पसरून प्रवासी, रिक्षाचालक व नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. या प्रलंबित समस्येबाबत एस.टी. महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी तसेच एल.पी. कॉर्नर रिक्षा संघटनेच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले होते. या निवेदनाची तातडीने दखल घेत नगराध्यक्ष सौ. माधवी राजेश बुटाला यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेऊन काम त्वरित सुरू करून पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.

नगराध्यक्षांच्या आदेशानंतर रात्रीच गटार दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. या कामावर स्वतः लक्ष ठेवण्यासाठी गटनेते श्री. निकेतन पाटणे, प्रभागाचे नगरसेवक श्री. प्रेमळ चिखले, नगरसेवक श्री. स्वप्नील सैतवडेकर आणि शहरप्रमुख श्री. कुंदन सातपुते हे पहाटेपर्यंत घटनास्थळी उपस्थित राहिले. त्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत आणि देखरेखीखाली चोकअप झालेली पाईपलाईन साफ करून दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले.
या कामामुळे एस.टी. स्टॅण्ड परिसरातील संपूर्ण रस्त्यावर पसरलेल्या सांडपाण्याचा प्रश्न निकाली निघाला असून नागरिक, प्रवासी आणि रिक्षाचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. वेळेवर घेतलेल्या निर्णयामुळे आणि लोकप्रतिनिधींच्या तत्परतेमुळे आरोग्य व वाहतूक यांच्याशी संबंधित संभाव्य धोके टळले असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. नगरपालिकेच्या या जलद कारवाईबद्दल परिसरातील नागरिक व व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले आहे.













