शिमगोत्सवातील मान-पानाचे वाद मिटवण्यासाठी पोलीस सरसावले

पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांचे आवाहन

रत्नागिरी | प्रतिनिधी
सध्या कोकणात गावोगावी शिमगोत्सव सुरु असल्यामुळे सगळे नागरिक उत्साहात आहेत. परंतू रत्नागिरी जिल्ह्यातील बऱ्याचशा गावांमधून शिमगोत्सवाच्या मान-पानातून वाद निर्माण होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. ज्या-ज्या गावांमध्ये मानपानाचे वाद आहेत ज्यामुळे शिमगोत्सवाच्या उत्साहावर विरजपण पडते त्या त्या ठिकाणी पोलिस प्रशासनाला सहभागी करुन वाद मिटवावेत असे आवाहन जिल्हा पोलिस अधिक्षक नितीन बगाटे यांनी पत्रकार परिषदेत केले.
जिल्हा पोलिस विभागाने ज्या-ज्या ठिकाणी शिमगोत्सवात मान-पानाचे वाद आहेत. त्याठिकाणी संबंधित ग्रामस्थांची बैठक घेतलेली आहे. उदा.सावर्डे, खेड आणि जिल्ह्यातील इतर ठिकाणीही असे वाद आहेत. त्याठिकाणी शिमगोत्सवाच्यावेळी आयोजकांनी आणि ग्रामस्थांनी पोलिसांना त्याची माहिती द्यावी पोलिस प्रशासन त्याठिकाणी त्या उत्सवात सहभागी होउन वाद मिटवण्याचा प्रयत्न करेल. एक सामाजिक बांधिलकी आणि सदभावना म्हणून ग्रामस्थांनीही पोलिस बांधवाना आपल्या उत्सवात सहभागी करुन घ्यावे आणि आपला सण चांगल्या रितीने साजरा करावा अशी सदिच्छा देत असल्याचेही बगाटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.