वेळणेश्वरच्या महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहात साजरा

गुहागर (प्रतिनिधी): वेळणेश्वर येथील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मध्यवर्ती ग्रंथालय विभागातर्फे कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त ‘मराठी भाषा गौरव दिन २०२६’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पारंपारिक दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी विद्या प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. विजय बेडेकर, प्रमुख अतिथी श्री. नरेंद्र गोळे (भाभा अणुसंशोधन केंद्राचे माजी अभियंता), प्राचार्य डॉ. अविनाश पवार आणि संस्थेचे सदस्य उपस्थित होते.

प्रमुख पाहुणे श्री. नरेंद्र गोळे यांनी “मराठी भाषेत तांत्रिक शब्दांचा वापर” या विषयावर मार्गदर्शन करताना सांगितले की, तांत्रिक शिक्षण मातृभाषेतून दिल्यास समज अधिक सखोल होते. त्यांनी स्वतः ३६ ग्रंथांतून अनेक तांत्रिक शब्दांचे मराठी अनुवाद केले असून ते आपल्या ब्लॉगद्वारे सर्वांसाठी उपलब्ध करून दिल्याचे नमूद केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. विजय बेडेकर यांनी आपल्या भाषणात मराठीला सक्षम ‘ज्ञानभाषा’ बनवण्याचे आवाहन केले. विज्ञान आणि तांत्रिक क्षेत्रात प्रमाण मराठीचा वापर वाढवणे ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल डॉ. संतोष चतुर्भूज यांनी केले, तर संपूर्ण सोहळ्याचे सूत्रसंचालन ग्रंथालय सहाय्यक दिनेश खेडेकर यांनी प्रभावीपणे केले. शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात हा सोहळा यशस्वीपणे संपन्न झाला.