शिक्षण विभागाच्या नव्या फतव्यामुळे प्राथमिक
शिक्षकांतून नाराजी, पालक वर्गातून तीव्र संताप व्यक्त
संतोष कोत्रे
लांजा : – होळीनिमित्त प्रशासनाने सोमवारी दोन मार्च रोजी सुट्टी जाहीर केलेली असतानाच शिक्षण विभागाकडून मात्र आज शनिवारी सकाळी सुट्टी रद्द करण्यात आली असल्याचा फतवा जाहीर करत प्राथमिक शिक्षकांना सोमवारी शाळेत हजर राहण्याचे आदेश देण्यात आल्याने शिक्षकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे तर होळीची सुट्टी अचानक रद्द केल्याने पालक वर्गातून संतापाची लाट निर्माण झाली आहे.
कोकणात शिमगोत्सव हा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो. सोमवारी दोन मार्च रोजी होळी असल्याने प्रशासनाकडून देखील सोमवारी सुट्टी जाहीर करण्यात आली होती. तर गुरुवार दिनांक २६ फेब्रुवारी रोजी शिक्षणाधिकारी आणि प्राथमिक शिक्षक संघटनांच्या झालेल्या बैठकीत देखील जिल्हा परिषद शाळांना सोमवारी दोन मार्च रोजी सुट्टी असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे शिक्षकांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना सोमवारी २ मार्च रोजी सुट्टी असल्याचे सांगितले होते.
असे असतानाच आज शनिवारी सकाळी अचानकपणे १०.२५ वाजता शिक्षण विभागाकडून २ मार्च रोजीची सुट्टी रद्द करण्यात आली असल्याचा फतवा काढण्यात आला. त्यामुळे शिक्षकवर्ग चक्रावून गेले. दोनच दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत २ मार्च रोजी होळी निमित्ताने सुट्टी असल्याचे सांगितलेले असताना अचानक ही सुट्टी शिक्षण विभागाकडून रद्द केल्याने शिक्षक वर्गात संभ्रम निर्माण झाला आहे.तर होळीच्या सणाची सुट्टी अचानक रद्द केल्याने पालक वर्गातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
आधीच प्राथमिक शिक्षकांच्या ८४ सुट्ट्यांपैकी ८ सुट्टया रद्द करण्यात आल्या होत्या. त्या रद्द करीत असताना जिल्हा शिक्षक संघटनांना विश्वासात घेणे आवश्यक होते. मात्र प्रशासनाने त्याबाबत विश्वासात न घेतल्याने शिक्षकांमध्ये नाराजी आहे. त्यात होळीची सुट्टी अचानक रद्द केल्याने या नाराजीत भर पडली आहे.
दरम्यान, शिक्षण विभागाकडून सुट्टी रद्द चा फतवा मागे घेतला जाणार का? याकडे शिक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.













