सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय (SSPMCOE), कणकवली येथील सेमिनार हॉल क्र. १ मध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व भाषिक अस्मितेचा अत्यंत महत्त्वाचा उत्सव म्हणून ओळखला जाणारा हा दिवस दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. हा दिवस ज्ञानपीठ पुरस्कार विजेते श्रेष्ठ कवी Vishnu Vaman Shirwadkar (कुसुमाग्रज) यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. मराठी साहित्यातील त्यांच्या अतुलनीय योगदानाचा गौरव करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.
कुसुमाग्रजांनी मराठी साहित्याला अनेक अजरामर कलाकृती दिल्या. त्यांच्या ‘विशाखा’ या काव्यसंग्रहाने मराठी काव्यविश्वात नवा आयाम निर्माण केला. ‘कणा’ ही प्रेरणादायी कविता विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आली. तसेच ‘नटसम्राट’ हे त्यांचे गाजलेले नाटक मराठी रंगभूमीवरील मैलाचा दगड मानले जाते. याशिवाय ‘हिमालयाची सावली’, ‘अंधारयुग’, ‘स्वप्न आणि सत्य’ यांसारख्या साहित्यकृतींमधून त्यांनी सामाजिक जाणीवा, मानवी मूल्ये आणि जीवनतत्त्वज्ञान प्रभावीपणे मांडले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून एस. एम. हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज, कणकवली येथील प्रा. मनीषा रवींद्र पाटील उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
प्रा. मनीषा पाटील यांनी “अभिजात मराठी” या विषयावर प्रभावी आणि ओघवत्या भाषेत व्याख्यान देताना मराठी भाषेच्या उच्च दर्जाच्या साहित्यिक व सांस्कृतिक परंपरेचा वेध घेतला. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्या काव्यपरंपरेपासून ते बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांपर्यंत आणि आधुनिक मराठी साहित्यापर्यंतचा समृद्ध वारसा त्यांनी उलगडून सांगितला. भाषेचा शुद्ध व सुबोध वापर करण्याचे महत्त्व अधोरेखित करत “तुमच्या मातृभाषेतून स्वप्न बघा आणि तुमच्या भाषेवर प्रेम करा” असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एस. बाडकर उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय मनोगतात त्यांनी मराठी ही केवळ संवादाची भाषा नसून ती आपल्या संस्कृतीची व परंपरेची ओळख असल्याचे सांगितले. तंत्रज्ञानाच्या युगातही मातृभाषेचा अभिमान बाळगणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
व्यासपीठावर राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. एस. टी. माने व प्रा. ए. व्ही. कुडतरकर, तसेच महाविद्यालयाच्या एआयएमएल विभागप्रमुख प्रा. पी. एस. राणे उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाचे विद्यार्थी प्रतिनिधी कु. भार्गवी कवटकर व कु. जिगीषा म्हापसेकर यांची उपस्थिती लाभली.
या व्याख्यानामुळे विद्यार्थी व शिक्षकांमध्ये मराठी भाषेबाबतची जागरूकता अधिक दृढ झाली. महाविद्यालयाच्या सांस्कृतिक समिती व NSS विभागाने मराठी भाषेचा गौरव जपण्याचा संकल्प व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेचे संस्थापक तथा खासदार नारायण राणे, अध्यक्षा सौ. नीलम राणे, उपाध्यक्ष आमदार निलेश राणे तसेच सचिव व मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री मा. नितेश राणे यांनी आयोजकांचे कौतुक केले.
या उपक्रमात महाविद्यालयातील सुमारे १४० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. फाल्गुनी लिंगायत यांनी केले. आयोजकांनी सर्व सहभागी विद्यार्थी व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.











