मसुरे | झुंजार पेडणेकर :बॅ. नाथ पै सेवांगण कट्टा शाखेचा संजय नाईक स्मृती उपक्रमशील शिक्षक पुरस्कार नांदोस येथील शिक्षक बाळकृष्ण धोंडी नांदोस्कर यांना जाहीर झाला आहे.
अत्यंत गरीब परिस्थितीतून शिक्षण घेत नांदोस्कर गुरुजींनी पदवीधर शिक्षक म्हणून नावलौकिक मिळवला आहे. वैभववाडी, कट्टा, पराड, मोगरणे, ओवळीये इत्यादी प्राथमिक शाळेत अध्यापन करून सध्या ते सुकळवाड येथील प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून काम करत आहेत.
एक उपक्रमशील शिक्षक अशी त्यांची ख्याती आहे. अनेक विज्ञान प्रदर्शनांमध्ये त्यांनी तयार केलेल्या अनेक मॉडेल्सना पारितोषिके मिळाली आहेत. शालेय व वैयक्तिक पातळीवर सुद्धा त्यांचा गौरव झाला आहे.
अत्यंत सुबक हस्ताक्षर असणाऱ्या गुरुजींच्या वर्गातील मुलांचे अक्षर सुबक असते. हस्ताक्षर स्पर्धेत त्यांच्या शाळेतील मुलांना बक्षीसे मिळतात.
‘कट पेनने’ कसे लिहावे याचे ही वर्ग ते घेतात.
स्कॉलरशिप परीक्षेचे गणित व बुद्धिमत्ता हे विषय ते अत्यंत सोप्या पद्धतीने शिकवतात.
विद्यार्थ्यांना अष्टपैलू बनवण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात. या अगोदर त्यांना सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला आहे.
त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी बॅ. नाथ पै सेवांगण कट्टा शाखेचा संजय नाईक स्मृती उपक्रमशील शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
हा पुरस्कार ८ मार्च २०२६ रोजी सायं. ५ वाजता ‘यशोधन’ पेंडूर, ता. मालवण येथे अष्टपैलू व्यक्तिमत्व महेश नाईक यांचे हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन बॅ. नाथ पै सेवांगण परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.












