खूणा पहाण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी
राजापूर (वार्ताहर): देवाच्या अस्तीत्वाबाबत अनेकदा शंका उपस्थित केल्या जातात. मात्र चराचरात सामावलेला देव वेगवेगळया रूपात, प्रसंगातून आपली प्रचिती भक्तांना देत असतोच. देवाच्या अस्तीत्वाचा दाखला देणारी खुणेची परंपरा अख्या कोकणात शिमगोत्सवात पाहायला मिळते. तब्बल २३ वर्षांनी शहरानजीकच्या मौजे शीळ गावची ग्रामदेवता श्री नवलादेवी मातेने अवघ्या दहा मिनिटातच गावकऱ्यांनी मारूती मंदिर मळा येथे लपवलेल्या खुणेचा शोध घेत आपल्या देवत्वाची आणि भक्तंना आपल्या अस्तीत्वाची प्रचिती दिली आहे. श्री नवलादेवी मातेने खुणेचा शोध घेताच उपस्थित भक्तांकडून देवीच्या नावाचा एकच जयघोष करण्यात आला.

वर्षभरापुर्वीच शीळ गावची ग्रामदेवता श्री नवलादेवी मातेच्या मंदिराचे जिर्णोध्दाराचे काम पुर्ण झाले आहे. तर रविवार १ मार्च पासून ग्रामदेवता श्री नवलादेवीच्या वार्षिक शिमगोत्सवालाही प्रारंभ झाला आहे. या एकूणच पार्श्वभूमीवर आणि आजच्या नवीन पीढीला आपली परंपरा, संस्कृती आणि देवाच्या दिव्यत्वाची प्रचिती यावी, या पिढीने देखील भविष्यात या परंपरा जोपासाव्यात आणि आपल्या संस्कृतीचे जतन करावे यासाठी २३ वर्षानी गावाने खुणेच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
श्री नवलादेवीच्या पालखीने ढोल ताशांच्या गजरात नाचत अवघ्या काही मिनिटातच आदल्या रात्री लपवून ठेवलेला खूणेचा शोध घेत आपल्या भक्तांना आपल्या अस्तीत्वाची प्रचिती देत मी आहे, नव्हे तुमच्या पाठीशी आहे अशी जणू ग्वाही दिली.
ढोल ताशाच्या गजरात नाचणाऱ्या पालखीने खुणा शोधली आणि उपस्थित भावीकांनी एकच जल्लोश केला आणि ज्या ठिकाणी देवीने खुणा शोधली तेथील माती आपल्या कपाळाला लावून पालखीच्या दर्शनासाठी एकच गर्दी केली. या ग्रामदेवतेच्या पालखीने खुणा शोधण्याच्या कार्यक्रमाला शेकडो भावीक उपस्थित होते.

कोकणात शिमगोत्सवानंतर खूणा घालण्याची प्रथा काही गावांमध्ये रूढ आहे. मात्र शीळ गावातील ग्रामस्थांनी शिमगोत्सवाच्या प्रारंभी ही खुणा घालुन श्री नवलादेवीचे आशीर्वाद घेत शिमगोत्सवाच्या कार्यक्रमाला प्रारंभ केला आहे.
यासाठी खूणेच्या आदल्या रात्री काही प्रमुख मंडळी गावातील एखादी सपाट जागा हेरून त्या ठिकाणी खड्डा खोदुन त्यात नारळ आणि फुलं लपवितात. आणि दुसऱ्या दिवशी ग्रामदेवतेची पालखी त्या ठिकाणी आणून ढोलताशाच्या गजरात नाचविली जाते. यावेळी खूणा ठेवणारे मानकरी खूणेच्या जागेवरची माती इतरत्र पसरवितात त्यामुळे पालखी या मातीच्या रोखाने खुणेचा शोध घेते आणि लपवून ठेवलेली ही खूणा बिनचूक शोधुन काढते.
त्याप्रमाणे शीळ येथे शुक्रवारी सकाळी मारूती मंदिर मळा येथे श्री नवलादेवीची पालखी वाजत गाजत आणण्यात आली. या ठिकाणी सकाळी ९ वाजून १८ मिनिटांनी ढोल ताशाच्या गजरात पालखी नाचविण्यास सुरूवात करण्यात आली. आणि अवघ्या काही मिनिटांत पालखी खुणेचा शोध घेऊ लागली. बरोबर ९ वाजून २८ मिनिटांनी म्हणजे अवघ्या १० मिनिटांनी पालखीने खुणेच्या ठिकाणी खूर मारत बैठक मारली आणि उपस्थित भाविकांनी श्री नवलादेवी मातेचा जयजयकार करत एकच जल्लोष केला. मग उपस्थित ग्रामस्थांनी दर्शनासाठी गर्दी केली. तब्बल २३ वर्षांनी ही अनुभुती श्री नवला देवीच्या भक्तांनी आणि ग्रामसथांनी घेतली. खूणेची प्रथा पाहण्यासाठी या परिसरातील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.











