सौ. अंतरा दुखंडे यांच्या मृत्यू मागील सत्य समोर यावे

वायंगणी गावातील महिलांचे पोलीस प्रशासनास निवेदन 

 

मालवण | प्रतिनिधी : सौ. अंतरा हर्षद दुखंडे रा. वायंगणी या विवाहितेचा मृतदेह संशयास्पद स्थितीत कालावल पुलाच्या खाली खाडी किनारी झाडी झुडूपात आढळून आल्यानंतर पंधरा दिवस उलटले. मात्र मृत्यू नेमका कसा झाला याबाबत काहीच माहिती मिळाली नाही. या प्रकरणी वायंगणी गावातील महिलांनी मालवण पोलीस ठाण्यात धडक दिली. या प्रकरणाचा तातडीने तपास करून अंतरा हिच्या मृत्यू मागील सत्य परीस्थिती समोर आणावी, यामध्ये कोणी दोषी असल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करावी. या मागणीचे निवेदन पोलीसांना दिले.

 

मालवण पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक प्रतिज्ञा खोत यांच्याकडे वायंगणी मधील महिलांनी निवेदन सादर करत तपासाबाबत चर्चा केली. या निवेदनावर माजी सरपंच मालती जोशी, उपसरपंच समृध्दी आसोलकर, ग्रा. प. सदस्य संजना रेडकर, सोनाली वायंगणकर, अपर्णा देसाई, दिपिका राणे, क्षमा सावंत, वनिता राणे, वैशाली वायंगणकर, लीना सावंत, मंजिरी राणे, प्रज्ञा धुळे, रसिका सावंत, समृध्दी सावंत, स्वप्नाली बाईत, सुषमा सावंत, दीपांजली सावंत यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 

शिक्षिका असणाऱ्या अंतरा दुखंडे या विद्यार्थ्यांमध्ये व पालकांमध्ये अत्यंत आदरणीय व विश्वासार्ह शिक्षिका म्हणून ओळखल्या जात होत्या. त्यांच्या अचानक झालेल्या संशयास्पद मृत्यूमुळे वायंगणी गावात तसेच पंचक्रोशी परिसरात संभ्रम व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झालेले आहे. विशेषतः गावातील विद्यार्थ्यांना मानसिक धक्का बसलेला असून महिलांमध्येही अस्वस्थता व भीतीची भावना निर्माण झालेली आहे. एकंदरीत गावाने एक कर्तव्यदक्ष व आदर्श शिक्षिका गमावल्यामुळे संपूर्ण गावात शोककळा पसरलेली आहे. त्यांच्या मृत्यूच्या घटनेला सुमारे पंधरा दिवसांचा कालावधी उलटूनही मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे प्रश्न निर्माण झाले असून असंतोषाची भावना वाढत आहे, असे महिलांनी निवेदनात म्हटले आहे.

 

एका महिलेला न्याय मिळत नसल्याने ८ मार्च रोजी होणाऱ्या महिला दिनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकू तसेच गावच्या ग्रामसभेवर बहिष्कार टाकू, असेही यावेळी महिलांनी सांगितले.