मंडणगड : धावपळीच्या युगात विश्वासाने दिलेली वस्तू सुरक्षित राहीलच याची खात्री देता येत नाही, याचा प्रत्यय मंडणगड तालुक्यातील महिलांना आला आहे. एका मीटिंगच्या बहाण्याने महिलांना एकत्र जमवून, त्यांच्याकडील सोन्याचे दागिने सुरक्षित ठेवण्याचे आमिष दाखवत एका भामट्याने तब्बल २ लाख ७१ हजार १०० रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. या धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून, पोलिसांनी याप्रकरणी ‘फौजदारी पात्र न्यासभंग’ (Criminal Breach of Trust) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
नेमका घटनाक्रम काय?
मिळालेल्या माहितीनुसार, ४ मार्च २०२६ रोजी आरोपी चंद्रकांत घाणेकर (रा. तेवरे, ता. चिपळूण; सध्या रा. नाशिक) याने तक्रारदार राजश्री विवेक गायकवाड (वय ५७, रा. विन्हे) आणि त्यांच्यासोबतच्या इतर सहा महिलांना एका नियोजित मीटिंगसाठी माणगाव येथे जायचे असल्याचे सांगितले. या प्रवासादरम्यान महिलांकडील दागिने चोरीला जाऊ नयेत किंवा हरवू नयेत, यासाठी त्याने एक ‘शक्कल’ लढवली.
“मिटिंगला जाताना एवढे दागिने सोबत नेणे सुरक्षित नाही, ते ऑफिसमध्ये जमा करा,” असे सांगून त्याने महिलांचा विश्वास संपादन केला. सुरक्षिततेच्या कारणास्तव महिलांनी स्वतःहून आपले दागिने एका लिफाप्यात भरले आणि तो लिफाफा आरोपी घाणेकरकडे सोपवला. मात्र, तो लिफाफा सुरक्षित ठिकाणी ठेवण्याऐवजी आरोपीने महिलांची दिशाभूल केली आणि दागिन्यांसह पोबारा केला.
नुकसानीचा तपशील
या फसवणुकीमध्ये सात महिलांचे दागिने आणि मोबाईलचा समावेश आहे:
साक्षी सोंडकर: १ तोळे ८ ग्रॅमचे सोन्याचे मंगलसूत्र (१ लाख रु.), ५ ग्रॅमचे छोटे मंगलसूत्र (३३ हजार रु.) आणि कानातील सोन्याचे झुंबर (१६ हजार रु.)
समीधा येरवणकर: कानातील सोन्याचे टॉप्स (१३ हजार रु.) आणि १० हजार रुपयांचा ओपो मोबाईल.जागृती तांबुटकर: सोन्याचे कैरीच्या आकाराचे झुमके (२० हजार रु.).
तेजस्वी सुतार: ५ ग्रॅमची सोन्याची चैन व बदामी आकाराचा गंडा (३३ हजार रु.).
सानिका गायकवाड: ७ ग्रॅमची सोन्याची चैन व गंडा (४६ हजार रु.).
गुन्हा दाखल आणि पोलीस तपास
घटनेनंतर काही दिवस आरोपीचा पत्ता न लागल्याने अखेर १० मार्च २०२६ रोजी राजश्री गायकवाड यांनी मंडणगड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ३१६(३) आणि ३१८(४) नुसार गुन्हा नोंदवला आहे. आरोपी सध्या नाशिक येथे वास्तव्यास असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत













