खाणमाफियांची मुजोरगिरी : तहसीलदारांच्या बंदी नंतरही विलवडेत सुरुंग स्फोटांचा थरकाप

तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली

​
बांदा : प्रतिनिधी
सावंतवाडीच्या तहसीलदारांनी दिलेले खाण बंदीचे स्थगितीच्या आदेशाला खाण माफियानी केराची टोपली दाखवली आहे. अगदी दुसऱ्याच दिवशी विलवडे परिसरात पुन्हा एकदा सुरुंग स्फोटांचा धडाका सुरू झाला आहे. मंगळवारी तहसीलदारांनी सर्व खाणींचे काम बंद ठेवण्याचे लेखी आदेश दिले असतानाही आज बुधवारी सकाळपासून तब्बल ११ स्फोट घडवून आणल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

​विलवडे परिसरातील क्वारी, क्रशरमुळे होणारा त्रास, घरांना जाणारे तडे आणि आरोग्याच्या प्रश्नावरून ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. याची दखल घेत तहसीलदार श्रीधर पाटील यांनी मंगळवारी सायंकाळी घटनास्थळी भेट दिली होती. जोपर्यंत अंतिम अहवाल येत नाही, तोपर्यंत सर्व खाणींचे काम तातडीने बंद ठेवण्याचे आदेश त्यांनी दिले होते. मात्र, या आदेशाची अंमलबजावणी होण्याऐवजी खाण मालकांनी प्रशासनालाच आव्हान दिल्याचे चित्र आज पाहायला मिळाले.

ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी ४ सुरुंग स्फोट झाले आणि त्यानंतर दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास एकापाठोपाठ सलग ७ सुरुंग स्फोट करण्यात आले. तहसीलदारांच्या आदेशानंतरही स्फोट होत असल्याने खाण मालक प्रशासनाला जुमानत नसल्याचे दिसून आले आहे.

या प्रकाराने ग्रामस्थ पुन्हा आक्रमक झाले आहेत. ​आदेशाचे उल्लंघन होत असल्याचे समजताच परिसरातील वातावरण तंग झाले आहे. सद्यस्थितीत तलाठी आणि महसूल अधिकारी यांनी विलवडे येथे धाव घेतली असून ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमा झाले आहेत. प्रशासनाचा कोणताही धाक खाण मालकांना उरला नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

​काल मंगळवारी तहसीलदारांनी खाण बंद ठेवण्याचे लेखी आदेश दिले होते. तरीही आज दिवसाढवळ्या ११ सुरुंग स्फोट झाले. हे प्रशासनाचे अपयश आहे. खाण माफिया प्रशासनाला जुमानत नसल्याचे दिसून येत असल्याची प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली.