अभय केंद्राच्या वतीने मोटरसायकल रॅली
वैभववाडी l प्रतिनिधी : जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय अंतर्गत अभय केंद्र वैभववाडी यांच्या वतीने ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या अभियानाअंतर्गत वैभववाडी शहरात जनजागृतीपर बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीद्वारे समाजात मुलींच्या शिक्षण व संरक्षणाबाबत जनजागृती करण्यात आली.
यावेळी सभापती सिद्धेश रावराणे, उपसभापती साची कोलते, गटविकास अधिकारी प्रिमेश वाघ, बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती काकडे, संरक्षण अधिकारी मिलन कांबळे, मुख्यसेविका मनस्वी कांबळे, विद्या गुरखे, संतोष जाधव, स्वानंदी शिरसाट, स्नेहल शिरोडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
रॅलीची सुरुवात पंचायत समिती वैभववाडी येथून होऊन दत्त मंदिरपर्यंत काढण्यात आली. यावेळी सहभागी अधिकारी व कर्मचारी यांनी “बेटी बचाओ, बेटी पढाओ” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला.
या उपक्रमात वैभववाडी पोलीस कर्मचारी, पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मुख्यसेविका तसेच जिल्हा महिला व बालविकास सिंधुदुर्ग विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ही रॅली ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या संकल्पनेवर आधारित असून पंचायत समिती ते दत्त मंदिर आणि पुन्हा पंचायत समिती असा मार्गक्रमण करत समाजात सकारात्मक संदेश देण्यात आला.











