‘घर म्हणजे जगण्यासाठी विणलेलं सुंदर स्वप्न’ : अभिनेता सुनील बर्वे

‘सावंतवाडी एन्क्लेव्ह ‘ प्रकल्पाचे दिमाखात उद्घाटन

लॅण्डक्राफ्ट स्पेसेसचा नवा व अभिनव उपक्रम

सावंतवाडी । प्रतिनिधी : “घर म्हणजे केवळ चार भिंतींचा सांगाडा नसून, ते जगण्यासाठी विणलेलं एक सुंदर स्वप्न असतं. कोकणासारख्या निसर्गदत्त भूमीत, त्यातही सावंतवाडी रेल्वे स्थानकासमोर इतक्या देखण्या वास्तूत राहण्याचे तुमचे स्वप्न साकार होताना पाहून मनापासून आनंद होत आहे. तुमच्या या सुखाच्या क्षणी तुमच्या आनंदात सहभागी होता आले हे माझे भाग्य समजतो, ” अशा शब्दांत प्रसिद्ध मराठी अभिनेते सुनील बर्वे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

मळगावस्थित सावंतवाडी रेल्वे स्थानकासमोर ‘लॅण्डक्राफ्ट स्पेसेस प्रा.लि. ‘च्या माध्यमातून साकारलेल्या ‘सावंतवाडी एन्क्लेव्ह’ या महत्त्वाकांक्षी गृहप्रकल्पाचा लोकार्पण सोहळा सुनील बर्वे यांच्या हस्ते अत्यंत उत्साहात पार पडला. यावेळी लॅण्डक्राफ्ट स्पेसेस प्रा.लि.चे संचालक दिलीप छुगेरा, बीना छुगेरा, हर्षद राजाध्यक्ष, अमित वडनेरे तसेच प्रकल्प व्यवस्थापक धनंजय महाले, विक्री सहाय्यक शुभदा सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देताना बर्वे पुढे म्हणाले की, “लहानपणी स्वतःच्या हक्काच्या वास्तूत प्रवेश करताना जो आनंद आम्ही अनुभवला होता, तोच ओसंडून वाहणारा आनंद आज इथल्या सभासदांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. हे घर तुम्हा सर्वांना सुख, समाधान आणि समृद्धी देणारे ठरो.”

 

*निसर्गाच्या सानिध्यात स्वप्नपूर्ती*

कोकण हा पृथ्वीवरील दुसरा स्वर्ग मानला जातो. याच स्वर्गाच्या दारी, सावंतवाडीसारख्या सांस्कृतिक तालुक्यात अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त असा हा प्रकल्प उभा राहिला आहे. उद्घाटनाच्या निमित्ताने बोलताना बर्वे यांनी या इमारतीत राहणाऱ्या सर्व रहिवाशांनी एका कुटुंबासारखे गुण्यागोविंदाने राहावे, अशी सदिच्छा व्यक्त केली. यावेळी त्यांचा व त्यांच्या पत्नीचा ‘लॅण्डक्राफ्ट स्पेसेस’च्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.

 

*कर्त्या हातांचाही सन्मान*

केवळ भव्य वास्तू उभी करणे नव्हे, तर ती उभी करणाऱ्या हातांचा गौरव करणे ही या सोहळ्याची जमेची बाजू ठरली. सुनील बर्वे आणि प्रकल्पाच्या संचालकांच्या हस्ते या गृहप्रकल्पासाठी अहोरात्र कष्ट घेणाऱ्या सर्व ठेकेदारांचा सन्मान करण्यात आला. लॅण्डक्राफ्ट स्पेसेस प्रा.लि.चे संचालक दिलीप छुगेरा, बीना छुगेरा, हर्षद राजाध्यक्ष आणि अमित वडनेरे यांनी यावेळी प्रकल्पाच्या उभारणीचा खडतर पण समाधानकारक प्रवास उलगडून दाखवला आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.

 

*भक्ती आणि शक्तीचा संगम*

उद्घाटन सोहळ्याची सुरुवात सकाळच्या सत्रात अत्यंत मंगलमय वातावरणात झाली. वास्तूशांती आणि श्री सत्यनारायण महापूजेने परिसरामध्ये चैतन्य निर्माण झाले होते. या सोहळ्याला प्रकल्प व्यवस्थापक धनंजय महाले, विक्री सहाय्यक शुभदा सावंत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन अरुणा प्रभू यांनी केले.

दिवसभर चाललेल्या या सोहळ्यात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल होती. सावंतवाडीच्या वैभवात भर घालणाऱ्या या ‘एन्क्लेव्ह’ प्रकल्पाच्या निमित्ताने अनेकांचे ‘घरकुलाचे’ स्वप्न आता सत्यात उतरले आहे.