
▪️मालवण तालुकास्तरीय कृषी महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद
▪️प्रगतशील शेतकऱ्यांचा झाला सन्मान
मसुरे | झुंजार पेडणेकर :
शेतकऱ्यां बरोबर ग्राहकांचा सुद्धा ट्रेंड बदलत आहे. नैसर्गिक शेतीकडे बघण्याचा दृष्ठिकोन सकारात्मक बनला आहे. त्याला आधुनिकतेची जोड देणे आवश्यक आहे. आजच्या कृषी महोत्सवासाठी कृषी विभागाचे चांगल्या प्रकारे नियोजन आहे. उपक्रमशील शेतकऱ्यांनी इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे आवश्यक आहे.कृषी विभागाने शेतकऱ्यांना पर्यत पोहोचावें. व शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवाव्यात. एआय तंत्राच्या माध्यमातून एक पाऊल पुढे आपल्या जिल्ह्याने टाकले आहे. रोजगाराच्या नवीन संधी शेतीच्या माध्यमातून निर्माण करा असे आवाहन जि. प. उपाध्यक्ष दादा साईल यांनी कट्टा येथे केले.
महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या तालुका कृषी अधिकारी मालवण कार्यालयाच्या वतीने तालुकास्तरीय कृषी महोत्सवाचे आयोजन मंगळवारी ओम साई गणेश मंगल कार्यालय ( मामा माडये हॉल) कट्टा बाजारपेठ येथे करण्यात आले होते.त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचा प्रारंभ दीप प्रज्वलन करून झाला. यावेळी व्यासपीठावर मालवण सभापती सौ प्रज्ञा चव्हाण,गटविकास अधिकारी शाम चव्हाण,उप विभागीय कृषी अधिकारी उमाकांत पाटील, तालुका कृषी अधिकारी अमोल करंदीकर, जि प सदस्य संतोष साटवीलकर, सौ क्षमा हडकर, सौ सुमेधा पाताडे, प. स. सदस्य संतोष गावडे, बंडू चव्हाण, मानसी भोगावकर,रिया बावकर, सौ सीमा परुळेकर, हवामान शास्त्रज्ञ डॉ उमराज मठार, डॉ गार्गी ओरसकर, उज्वला चव्हाण, आत्मा अध्यक्ष प्रताप चव्हाण तसेच तालुक्यातील सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान अन्नधान्य पिके योजनेतून शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाची तंत्रज्ञान माहिती बाबत कृषी शास्त्रज्ञांनी मार्गदर्शन केले. तसेच मालवण तालुक्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कृषी मालाचे/ उत्पादनांचे नमुने यावेळी कृषी प्रदर्शनात मांडण्यात आले होते. पौष्टिक तृणधान्य अर्थात नाचणी, वरी यासारख्या भरड धान्यापासून बनविलेल्या पाककृतींचे प्रदर्शन व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
प्रस्ताविक तालुका कृषी अधिकारी अमोल करंदीकर यांनी करताना आंबा बागायतदारांसाठी दापोली येथे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्याचा मानस व्यक्त केला. गटविकास अधिकारी शाम चव्हाण यांनी शेतकऱ्याना प्रशासनाकडून पूर्णतः सहकार्य मिळेल असे सांगताना आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्याने मजुरांची 77 लाख रुपयांची बिले प्राप्त झाल्याचे सांगितले. सभापती सौ. चव्हाण यांनी शेतकरी कष्ट घेऊन शेती करत असून कृषी विभागाने सुद्धा शासनाच्या योजना लाभार्थ्यां पर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले.
उपविभागीय कृषी अधिकारी उमाकांत पाटील म्हणाले, बदलत्या हवामानाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे येणाऱ्या हंगामात शेतकऱ्यांना फार्मर कप च्या माध्यमातून समूहाने सामोरे जाणे आवश्यक आहे. यातून शेतीत सकारात्मक बदल करू शकतो असे सांगितले. जीप सदस्य सौ सुमेधा पाताडे यांनी शेती उद्योग सर्वात श्रेष्ठ असल्याचे सांगितले. मालवण येथील शेतकरी उत्तम फोंडेकर, आंबडोस येथील धोंडी नाईक, तिरवडे येथील शंकर गावडे, पोईप येथील साईराज पावसकर-(दुग्ध व्यवसाय) , असगणी जगदीश कासले ( बांबू), मनाली करंगुटकर- हडी, संतोष धुरी – गोठणे (काजू प्रक्रिया) या शेतकऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.डॉ उमरज मठाळ यांनी दुपारच्या सत्रात मार्गदर्शन केले. सूत्रसंचलन उपकृषी अधिकारी धनंजय गावडे, आभार पवनकुमार सौगंडे यांनी मानले. यावेळी कृषी विभागाचे अधिकारी, कृषी सहाय्यक, कृषी सेवक तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.













