कोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात महिलांचा संताप; वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरोधात मोर्चा

खेड (प्रतिनिधी) – रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कोरेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कथित मनमानी कारभाराविरोधात खाडीपट्ट्यातील महिलांनी आज तीव्र आंदोलन छेडत मोर्चा काढला. या आंदोलनामुळे आरोग्य केंद्र परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याची बदली झाल्यानंतरही त्यांनी अद्याप पदभार न सोडल्याचा गंभीर आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. तसेच शासकीय निवासस्थान देखील रिकामे न केल्यामुळे स्थानिकांमध्ये नाराजी वाढली आहे. या प्रकारामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.

आंदोलनकर्त्या महिलांनी वैद्यकीय अधिकाऱ्यावर ड्युटीदरम्यान ग्रामीण भागातील रुग्णांकडून अनधिकृतरित्या पैशांची मागणी केल्याचा आरोप केला. याशिवाय रुग्णांशी उद्धट वर्तन, कर्तव्यातील अनियमितता आणि वेळेचे पालन न केल्यामुळे रुग्णांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. या सर्व प्रकारांमुळे महिलांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले असून आरोग्य सेवांबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

दरम्यान, मोर्चाच्या वेळी संबंधित वैद्यकीय अधिकारी अनुपस्थित असल्याने आंदोलनकर्त्यांचा रोष आणखी वाढला. “बदली झालेल्या डॉक्टरांनी तात्काळ कार्यभार सोडून नवीन ठिकाणी रुजू व्हावे, तसेच शासकीय क्वार्टर रिकामे करावे,” अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली. तसेच नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या डॉक्टरांनी तत्काळ पदभार स्वीकारावा, जेणेकरून रुग्णसेवा सुरळीत सुरू राहील, अशीही मागणी करण्यात आली.

याशिवाय आरोग्य केंद्रातील रिक्त पदे तातडीने भरावीत आणि रुग्णांकडून अनधिकृतपणे घेतलेल्या पैशांबाबत लाचलुचपत विभागामार्फत सखोल चौकशी करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्या अंकिता शिगवण आणि सौ. पालकर यांनी केली. दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.

या आंदोलनात पंचायत समिती सदस्य निसार सुर्वे आणि समीक्षा म्हादे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. अचानक उभ्या राहिलेल्या या आंदोलनामुळे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले असून आता संबंधित प्रकरणात काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.