शहीद रामचंद्र सोमा गावडे यांच्या स्मारकाचे चौकुळमध्ये अनावरण

३८ वर्षांनंतर शौर्यगाथेला उजाळा : देशभक्ती आणि कृतज्ञतेचा संगम

​सावंतवाडी । प्रतिनिधी :
श्रीलंकेतील ‘ऑपरेशन पवन’ मोहिमेत देशासाठी सर्वोच्च बलिदान देणारे सुपुत्र शहीद रामचंद्र सोमा गावडे यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा आज चौकुळ-केगदवाडी येथे अत्यंत भावूक वातावरणात पार पडला. वीरमरण आल्यानंतर तब्बल ३८ वर्षांनी शहीद गावडे यांच्या कुटुंबीयांनी हे स्मारक उभारले असून, या निमित्ताने संपूर्ण चौकुळ पंचक्रोशीत देशभक्ती आणि कृतज्ञतेचा संगम पाहायला मिळाला.

​आज सकाळी १० वाजता सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते स्मारकाचे व शौर्याचे प्रतीक असलेल्या बंदुकीचे अनावरण करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, तहसीलदार श्रीधर पाटील, कॅप्टन मार्टिन, माजी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, जिल्हा परिषद सदस्य शोभा गावडे, सरपंच गुलाबराव गावडे, पंचायत समिती सदस्य मायकल डिसोजा, आंबोली सरपंच सावित्री पालेकर, दिनेश गावडे यांच्यासह कोल्हापूर आणि बेळगाव येथून आलेले ‘वायु मराठा बटालियन’चे आजी-माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. प्राचार्य भारत गावडे यांनी शहीद गावडे यांच्या पराक्रमाचा इतिहास उपस्थितांसमोर मांडला. यावेळी ‘ऑपरेशन पवन’मध्ये शहीद गावडे यांच्यासोबत असलेल्या सहकाऱ्यांनी त्या काळातील थरारक अनुभव कथन केले. पुलाखाली लपवलेल्या ग्रेनेड बॉम्बचा स्फोट होऊन गाडी हवेत उडाली आणि त्या भीषण घटनेत रामचंद्र गावडे यांना वीरमरण आले, हा प्रसंग सांगताना उपस्थित प्रत्येक नागरिकाचे डोळे पाणावले.

​हा सोहळा शहीद गावडे यांच्या कुटुंबीयांसाठी अत्यंत भावूक क्षण होता. वीरमरण आले तेव्हा मुले खूप लहान होती, त्यांना वडिलांच्या स्मृती स्पष्टपणे आठवत नाहीत. मात्र, आज वडिलांच्या शौर्याच्या कथा ऐकताना पत्नी सीता गावडे, मुलगा सुनील, सून समीक्षा आणि कन्या शिल्पा व शीतल यांना अश्रू अनावर झाले. उपस्थितांनी दोन मिनिटे स्तब्ध राहून आणि पुष्पचक्र अर्पण करून या वीर जवानाला मानवंदना दिली.

​यावेळी बोलताना आमदार दीपक केसरकर म्हणाले की, चौकुळ हे खऱ्या अर्थाने “सैनिकांचे गाव” आहे. येथील मातीने देशाला अनेक वीर जवान दिले असून, येथील सैन्य परंपरा संपूर्ण राज्यासाठी प्रेरणादायी आहे. प्रतिकूल परिस्थितीतही येथील तरुणांनी देशसेवेचे व्रत जोपासले, हे अभिमानास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले. कॅप्टन मार्टिन यांनीही मराठा बटालियनच्या जाज्वल्य इतिहासाची माहिती दिली.

​चौकुळ गावात प्रथमच अशा स्वरूपाचा लष्करी इतमामातील सोहळा पार पडल्याने ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. स्थानिक शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या वीरगीतांनी संपूर्ण परिसर देशभक्तीमय झाला होता. दुपारच्या स्नेहभोजनानंतर या सोहळ्याची सांगता झाली. ३८ वर्षांनंतर का होईना, पण आपल्या गावच्या सुपुत्राचे स्मारक उभे राहिल्याने चौकुळच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.