खेड (प्रतिनिधी) : जगबुडी नदी पुलावर शनिवारी दुपारी सुमारे १.१५ वाजण्याच्या सुमारास केमिकल टँकरचा भीषण अपघात झाला. मुंबईहून लोटे एमआयडीसीकडे निघालेला हा टँकर अचानक पलटी झाल्याने टँकरमधील इथेनॉल नदीपात्रातील पाण्यात मिसळू लागल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यामुळे परिसरात पर्यावरणीय धोक्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सदर टँकर लोटे येथील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीसाठी केमिकल घेऊन जात होता. अपघातात टँकर चालकाला गंभीर दुखापत झाली असून त्याला तत्काळ उपचारासाठी अन्यत्र हलवण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे.
या घटनेची माहिती मिळताच भरणे नाका येथील सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील पाटणे व त्यांच्या मित्रपरिवाराने तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. तसेच खेड पोलिसांनीही घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी याच कंपनीचा केमिकल घेऊन जाणारा टँकर भोस्ते घाटात पलटी झाल्याची घटना घडली होती. वारंवार घडणाऱ्या अशा अपघातांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.












