सावंतवाडी बसस्थानकाचे ‘स्वच्छ, सुंदर’ अभियानांतर्गत मूल्यांकन पूर्ण

परिवहन महामंडळाच्या नाशिक नाशिक प्रदेश समितीने केली पाहणी

​सावंतवाडी । प्रतिनिधी :
‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान २०२५’ अंतर्गत शनिवारी सावंतवाडी बसस्थानकाचे चौथ्या टप्प्यातील मूल्यांकन सर्वेक्षण करण्यात आले. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक प्रदेश समितीने ही पाहणी केली.

​या समितीमध्ये नाशिकचे प्रादेशिक व्यवस्थापक विजय गीते, वरिष्ठ सांख्यिकी अधिकारी राकेश पवार, पत्रकार उमेश सावंत आणि महिला प्रवासी प्रतिनिधी तृप्ती मालविया यांचा समावेश होता. समितीने बसस्थानकावरील प्रवासी सुविधा, वाहतूक नियंत्रण कक्ष, प्लॅटफॉर्म स्वच्छता, तिकीट आरक्षण केंद्र, पाणीपुरवठा आणि स्वच्छतागृहांची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच इमारतीची डागडुजी, सुशोभीकरण, चालक-वाहक विश्रांती गृह, वर्कशॉप आणि एसटी बसची स्वच्छता तपासून गुणदान केले.

​प्रादेशिक व्यवस्थापक विजय गीते यांनी सांगितले की, “नाशिक समितीने मुंबई प्रदेशातील सहा जिल्ह्यांमधील १८ ‘अ’ वर्गातील बसस्थानकांचे सर्वेक्षण केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ आणि सावंतवाडी ही दोन स्थानके ‘अ’ वर्गात असून, येथील सर्वेक्षणाचा अहवाल मुंबई मुख्य कार्यालयाकडे सादर केला जाईल. राज्यातील सर्व जिल्ह्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर अंतिम निकाल जाहीर होईल.”

​याप्रसंगी आगार व्यवस्थापक निलेश गावित यांनी समिती सदस्यांचे स्वागत केले. यावेळी वाहतूक निरीक्षक प्रांजल धुरी, रेषा सावंत, किशोर यादव, अरुण पवार आदी कर्मचारी उपस्थित होते.