जिद्द, संघर्ष आणि नेतृत्व याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे खासदार नारायण राणे साहेब-आमदार किरण सामंत

राजापूरात ना. राणे यांच्या वाढदिवसानिमित्त ७५ अमृतज्येष्ठ नागरिकांचा सन्मान

राजापूर (वार्ताहर): जिद्द, संघर्ष आणि नेतृत्व याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे माजी केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे होत. सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या राणेसाहेबांनी आपल्या कार्यकतृत्वाच्या जोरावर देशात वेगळी ओळख निर्माण केली. त्यांचे कोकणच्या विकासातील योगदान उल्लेखनीय असून त्यांच्या कामातून प्रेरणा घेवून सामाजासाठी काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आमदार किरण सामंत यांनी येथे केले.
कोकणचे भाग्यविधाते रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त रविंद्र नागरेकर यांच्या पुढाकारातून रविदादा सहयोगी मंडळ आणि एनआर प्रतिष्ठानच्या वतीने राजापूरात अभिष्टचिंतन सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून आमदार किरण सामंत बोलत होते. या कार्यक्रमात तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या ७५ वर्षीय अमृतज्येष्ठ ७५ व्यक्तिंचा आमदार सामंत यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तर आमदार किरण सामंत यांच्या हस्ते केक कापून ७४ वा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी अनेकांनी खासदार राणे यांना निरामय दिर्घायुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
यावेळी व्यासपीठावर संयोजक आयोजक रविंद्र नागरेकर, शिवसेना विधानसभा क्षेत्राध्यक्ष राजू कुरूप, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अशफाक हाजू, शिवसेना तालुकाप्रमुख दिपक नागले, महिला आघाडी प्रमुख सौ. डबरे, पं. स. सभापती नंदिनी कदम, राजापूर अर्बन बँकेचे अध्यक्ष एड. शशिकांत सुतार, एड. यशवंत कावतकर, अध्यात्मिक गुरू विश्वनाथ उर्फ भाई गोसावी, कुणबी पतपेढीचे अध्यक्ष प्रकाश मांडवकर, माजी जि. प. सदस्य आबा आडिवरेकर, दिपक बेंद्रे, प्रसन्न मालपेकर, अरविंद लांजेकर यांसह जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना श्री. सामंत म्हणाले कि, कोकणच्या भूमीतील या महान, कतृत्वावान नेतृत्वाने जिद्द संघर्ष आणि मेहनत करत देशाचे नेतृत्व केले. त्यांनी राज्याचे प्रभावशाली मुख्यमंत्री म्हणून काम करताना महसुल, उद्योग अशा विविध खात्याचे काम करताना या सर्वच खात्यांचा कारभार एका उंचीवर नेवून ठेवला. कोकणवर त्यांचे विशेष प्रेम राहीले. कोकण सुजलाम सुफलाम होण्यासाठी अतिशय मेहनत घेतली. त्यांच्या प्रयत्नांमुळेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न सर्वात जास्त असल्याचे पाहायला मिळते. जनतेच्या प्रश्नांवर त्यांनी नेहमीच ठाम भूमिका घेतली. राजकीय जीवनात त्यांनी मिळविलेले हे यश संघर्ष आणि परिश्रमातून मिळविलेले यश असून सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकाने त्यांच्या जीवनापासून प्रेरणा घेवून वाटचाल केली पाहिजे असे ते म्हणाले.
प्रास्ताविक रविंद्र नागरेकर यांनी केले. त्यांनी नारायण राणे साहेब यांच्या कार्य आणि कतृत्वापासून प्रेरीत होवून आपण समाजकारण आणि राजकारणात आलो. जो चांगले काम करतो त्याच्या पाठीशी राहिले पाहिज या भूमिकेतून आपण काम करत आलो. आपल्या पदाचा उपयोग समाजासाठी, लोकांसाठी झाला पाहिजे या जाणीवेतून कार्यरत राहून तालुक्यात काम केले. तालुक्यातील तरूणांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहिलो. त्यामुळे आपल्या कोकणच्या भूमीचे एकमेव नेतृत्व असलेल्या राणे साहेबांच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या पर्दापणाचे औचित्य साधून तालुक्यातील समाजासाठी कष्ट घेणाऱ्या ७५ व्यक्तिंचा सन्मान करण्याचे ठरविले आणि त्यातून हा सोहळा साकार होत असल्याचे नागरेकर यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला तालुक्याच्या विविध भागातून मोठया संख्येन ना. राणे प्रेमी मोठया संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मोहन पाडावे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रविदादा मित्र मंडळाने विशेष परिश्रम घेतले.