पलायन करण्याच्या प्रयत्नात अपघातग्रस्त ट्रक घाटातच उलटला
अडीच तास वाहतूक ठप्प : ट्रक चालक ताब्यात
आंबोली । प्रतिनिधी : आंबोली घाटात फरशीची वाहतूक करणाऱ्या एका सुसाट ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात निकिता प्रसाद राऊत (वय १०, रा. फौजदारवाडी, आंबोली) या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला, तर तिची आई चैताली राऊत या गंभीर जखमी झाल्या आहेत. अपघातानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेला ट्रक काही अंतरावर उलटल्याने घाटातील वाहतूक तब्बल अडीच तास खोळंबली होती.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास निकिता आपल्या आईसोबत दुचाकीवरून जात असताना, आंबोली घाटातील ‘यु’ आकाराच्या धोकादायक वळणावर समोरून येणाऱ्या फरशीने भरलेल्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, निकिताचा जागीच अंत झाला. आई चैताली राऊत या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत.
*पलायन करताना ट्रक उलटला*
अपघात झाल्यानंतर घाबरलेल्या ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही अंतरावरच वेगावरील नियंत्रण सुटल्याने हा ट्रक घाटातच पलटी झाला. यामुळे ट्रक मधील फरशा रस्त्यावर विखुरल्या आणि घाटाच्या दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. तब्बल अडीच तासांहून अधिक काळ प्रवाशांना रांगेत ताटकळत उभे राहावे लागले.
*ग्रामस्थ आक्रमक, पोलीस घटनास्थळी*
या घटनेची माहिती मिळताच आंबोलीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. स्थानिकांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत संबंधित ट्रक चालकावर कठोर कारवाईची मागणी केली. पोलिसांनी प्रसंगावधान राखून ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, पोलीस हवालदार रामदास जाधव, संतोष गलोले व त्यांच्या पथकाने तातडीने धाव घेतली. पोलिसांनी ग्रामस्थांना शांत करत वाहतूक सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले.
मृत निकिताचा मृतदेह सुरुवातीला आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला होता, तिथून पुढील कार्यवाहीसाठी तो सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात येणार आहे. गंभीर जखमी असलेल्या चैताली यांनाही अधिक उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या घटनेमुळे संपूर्ण आंबोली परिसरात शोककळा पसरली असून, घाटातील अवजड वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणण्याची मागणी जोर धरत आहे.












