‘महाराष्ट्र उदय’ स्पर्धेत द्वितीय; ‘भारत उदय’ राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
चिपळूण (प्रतिनिधी) : नुकत्याच कल्याण येथे झालेल्या ७५ व्या राज्य अजिंक्यपद हौशी शरीर सौष्ठव स्पर्धा २०२५-२६ मध्ये चिपळूणचे सुपुत्र तथा डी.बी.जे. कॉलेजचे विद्यार्थी तसेच फ्लेमेबुल जिमचा व्यायाम पट्टू यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. प्रतिष्ठेच्या वय वर्ष २० च्या आतील ‘महाराष्ट्र उदय’ स्पर्धेत उंचीच्या तिसऱ्या गटात द्वितीय क्रमांक पटकावत सिलव्हर मेडल प्राप्त करून त्यांनी रत्नागिरी येथे होणाऱ्या वय वर्ष २० च्या आतील ‘भारत उदय’ राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याची निवड झालेली आहे.
शरीर सौष्ठव हा त्यांचा आवडीचा आणि जिद्दीचा विषय असून, त्यासाठी ते सातत्याने मेहनत घेत आहेत. नियमित व्यायाम, शिस्तबद्ध दिनचर्या आणि योग्य आहारपद्धती यांचे काटेकोर पालन करत त्यांनी आपली शरीरयष्टी घडवली आहे. कठोर परिश्रम आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी यापूर्वीही जिल्हा निवड चाचणीमध्ये प्रथम क्रमांक मिळवून यश मिळविले आहे. राज्यस्तरीय पातळीवर मिळविलेले हे यश त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. कु. श्लोक अनुराधा सचिन शिंदे, यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल चिपळूण शहर परिसरातील त्याचे नातेवाईक, हितचिंतक, मित्रपरिवार तसेच शहरातील नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आगामी राष्ट्रीय स्पर्धेतही तो उज्वल यश मिळवेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.













