म्हापण ग्रा.पं. मध्ये सभापती शंकर घारे यांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी..

वेंगुर्ले : प्रतिनिधी

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती म्हापण ग्रामपंचायत येथे विविध कार्यक्रम, व्याख्यान व मान्यवरांच्या सत्कार समारंभ यासह वेंगुर्ले पंचायत समितीचे सभापती श्री शंकर घारे यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात सिद्ध अमृतनाथ महिला ग्रुप गोसावीवाडी यांच्या प्रार्थना व स्वागत गीताने झाली. त्यानंतर धम्म गीतांचे पठण करण्यात आले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट दाखवणारा कार्यक्रम मोठ्या पडद्यावर प्रसारित करण्यात आला. तसेच यावेळी उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर विविध मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली. शेवटी सुप्रसिद्ध विचारवंत डॉ. प्रसाद देवधर यांनी “समाजातील विषमता व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार” यावर व्याख्यान झाले. त्यानंतर मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रम संपविण्यात आला. यावेळी उपसभापती श्री सचिन देसाई, जिल्हा परिषद म्हापण प्रभागाच्या सदस्या सौ यज्ञा साळगावकर, पंचायत समिती सदस्य श्री विष्णू फणसेकर, सरपंच सौ आकांक्षा चव्हाण, उपसरपंच श्रीकृष्ण ठाकूर, निवती पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्री भीमसेन गायकवाड व अन्य मान्यवर उपस्थित होते. तसेच यावेळी बहुसंख्येने म्हापण ग्रामस्थ नागरिक व गावातील शासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.