दोन वर्षांत काम पूर्ण करण्याचा आ. दीपक केसरकर यांचा मानस
सावंतवाडी । प्रतिनिधी :
सावंतवाडी येथील रेंगाळलेले एसटी बसस्थानकाचे काम आता बीओटी (BOT) तत्त्वावर लवकरच हाती घेण्यात येणार आहे. येत्या दोन महिन्यांत याचा नवीन आराखडा तयार करून टेंडर प्रक्रिया राबवण्यात येईल. हे बसस्थानक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठे स्थानक ठरणार असून ते विमानतळाच्या धर्तीवर अद्यावत करण्यात येईल, अशी माहिती आमदार दीपक केसरकर यांनी आज दिली.
आमदार केसरकर यांनी आज एसटी बसस्थानक परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत आराखडा तयार करणारे प्रसिद्ध वास्तुविशारद हापीस कॉन्ट्रॅक्टर यांचे प्रतिनिधी हुजेफा भोल, एसटीचे विभागीय अभियंता अक्षय केंकरे, मुख्याधिकारी विनायक औंधकर, बांधकाम अभियंता तुषार सरडे आणि आगार व्यवस्थापक निलेश गावित उपस्थित होते.
केसरकर म्हणाले की, कोरोना काळात या कामात खंड पडला होता. त्यामुळे आपण परिवहन मंत्र्यांकडे पाठपुरावा करून हे काम बीओटी तत्त्वावर घेण्याची मागणी केली होती. साधारण ४ एकर जागेत हे स्थानक उभे राहणार असून यासाठी १०० वर्षांचा करार केला जाईल. यामध्ये चार्जिंग स्टेशन आणि व्यावसायिक दुकान गाळ्यांचा समावेश असेल. जुन्या आराखड्यातील डेपो इमारत तशीच ठेवून नव्या आराखड्यानुसार उर्वरित बांधकाम केले जाईल.
यावेळी त्यांनी स्पष्ट केले की, हे काम करताना कोणाचेही विस्थापन होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल. तसेच, बसस्थानकाच्या कामात अडथळा ठरणारा पशुवैद्यकीय दवाखाना दुसरीकडे हलवण्याबाबत चर्चा सुरू आहे.
बसस्थानकासोबतच सावंतवाडीतील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा प्रश्नही लवकरच बैठक घेऊन मार्गी लावणार असल्याचे त्यांनी सांगितले. मतदारसंघातील आरोग्य व्यवस्था बळकट करून सर्वसामान्य जनतेला उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे केसरकर यांनी नमूद केले.












