देवराई गोपाळकृष्ण मंदिर नजीकची घटना
लांजा (प्रतिनिधी) विनापरवाना बंदूक आणि जिवंत काडतूसे जवळ बाळगल्या प्रकरणी लांजा पोलिसांनी दोघांना बंदूक आणि काडतूसांसह ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे. ही घटना आज बुधवारी १५ एप्रिल रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास देवराई गोपाळकृष्ण मंदिर नजीक घडली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लांजा पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी आज बुधवारी लांजा शहरा जवळच्या देवराई येथे छापा टाकला. यावेळी देवराई गोपाळ कृष्ण मंदिर जवळील नदीच्या पलीकडे झुडपात अरुण नारायण चौगुले (वय ४६, राहणार भडे पिंपळवाडी तालुका लांजा) आणि शैलेश दिलीप मेस्त्री (वय ३३ राहणार इसवली सुतारवाडी) असे दोघेजण १२ बोअरची बंदूक आणि जिवंत काडतूसांसह आढळून आले. या बंदुकीची किंमत दहा हजार रुपये आणि ३३० रुपये किंमतीची जिवंत काडतूसे असा एकूण १० हजार ३३० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
विनापरवाना बारा बोअरची बंदूक आणि तीन जिवंत काडतूसे जवळ बाळगल्या प्रकरणी लांजा पोलिसांनी अरुण चौगुले आणि शैलेश मेस्त्री या दोघांवर भारतीय हत्यार अधिनियम १९५९ चे कलम ३(१)/२५, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोद सरंगळे हे करत आहेत











