कोंदवली येथील गुरुत्ववाहिनीचे काम करताना प्रशासन व ठेकेदार यांनी स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात घेऊन काम करावे – आ. किरण सामंत

राजापूर प्रतिनिधी :राजापूर शहर पाणीपुरवठा योजनेअंतर्गत कोंदवली येथील गुरुत्ववाहिनीचे काम करताना प्रशासन व ठेकेदार यांनी स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात घेऊन व चर्चा करून हे काम मार्गी लावावे अशा सुचना आमदार किरण सामंत यांनी दिल्या आहेते.
या कामात निर्माण झालेल्या अडचणींवर मार्ग काढण्यासाठी आ. किरण सामंत यांनी पुढाकार घेत प्रशासन, ठेकेदार व स्थानिक ग्रामस्थांसह सर्व नगरसेवक यांची एक आढावा बैठक घेतली.
या बैठकीत संबंधित विभागाचे अधिकारी, ठेकेदार तसेच स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. गुरुत्ववाहिनीच्या कामादरम्यान काही ठिकाणी स्थानिक पातळीवर अडथळे निर्माण झाले होते. यामुळे हे काम रखडले होते आणि ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण होते. या पार्श्वभूमीवर आ. सामंत यांनी स्वतः हस्तक्षेप करत सगळयांची एकत्र बैठक घेत यावर चर्चा घडवून आणली.
यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी आपल्या अडचणी व शंका स्पष्टपणे मांडल्या. यावर कोणतेही काम करताना स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात घेणे अत्यावश्यक आहे. ग्रामस्थांच्या भावना आणि अडचणी लक्षात घेऊनच काम पुढे न्यावे, अशा स्पष्ट सुचना आ. सामंत यांनी प्रशासन व ठेकेदार यांना दिल्या. तर सदरच्या कामाची गती वाढवा, कोणत्याही प्रकारचा विलंब सहन केला जाणार नाही, असा इशाराही आ. सामंत यांनी दिला.
या बैठकीला तहसीलदार विकास गंबरे, सभापती नंदनी कदम, उपसभापती अभिजीत गुरव, मुख्याधिकारी अभिजीत कुंभार, गटविकास अधिकारी संतोष म्हेत्रे, उपनगराध्यक्ष विनय गुरव, पाणीपुरवठा सभापती सौरभ खडपे , नगरसेवक जमीर खलफे, जि. प. सदस्य प्रकाश कुवळेकर, ॲड. यशवंत कावतकर, माजी सभापती हरिभाऊ गुरव सर्व नगरसेवक, कोदवली ग्रामस्थ व अधिकारी वर्ग उपस्थित होते.