असुरक्षित खेळसाहित्याकडे दुर्लक्ष ठरले जीवघेणे
निष्काळजीपणामुळे मृत्यूचा गुन्हा दाखल; तपास सुरू
पुण्यातील हडपसर परिसरात स्लाईड कोसळून एका साडेचार वर्षांच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या प्रकरणी सोसायटीच्या अध्यक्ष आणि समिती सदस्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रहिवाशांनी वारंवार इशारे देऊनही सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे. अपघात 7 एप्रिल रोजी घडला असून 15 एप्रिल रोजी उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू झाला. पोलिसांनी निष्काळजीपणामुळे मृत्यूचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
पुणे : हडपसर परिसरात 7 एप्रिल रोजी सोसायटीच्या आवारातील स्लाईड कोसळून साडेचार वर्षांच्या मुलीचा गंभीर अपघात झाला होता. उपचारादरम्यान 15 एप्रिल रोजी तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी सोसायटी अध्यक्ष आणि समिती सदस्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार काही महिन्यांपूर्वी मोकळ्या जागेत बसवलेली स्लाईड असुरक्षित स्थितीत होती. रहिवाशांनी वारंवार याबाबत सूचना दिल्या तरीही अध्यक्ष व सदस्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे.
7 एप्रिल रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास मुलगी शाळेतून परतल्यानंतर आवारात खेळत होती. ती स्लाईडवर चढत असताना ती अचानक हादरली आणि कोसळली. संपूर्ण रचना मुलीवर पडल्याने तिच्या डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली.
घटनेनंतर आईने तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 106 (निष्काळजीपणामुळे मृत्यू) आणि 3(5) अंतर्गत गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.









