सिंधुदुर्गात पतसंस्थांसाठी एमआयएस कार्यशाळा उत्साहात

२३ मे रोजी आंबोलीत जिल्हास्तरीय अधिवेशन

कुडाळ | प्रतिनिधी : जिल्ह्यातील पतसंस्थांनी डिजिटल युगाची पावले ओळखून ‘एमआयएस’ प्रणालीचा प्रभावी वापर करावा. पारदर्शक आणि कार्यक्षम प्रशासनाद्वारेच सहकार चळवळ अधिक सक्षम होईल, असे प्रतिपादन सिंधुदुर्गचे जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे यांनी केले.

जिल्ह्यातील पतसंस्थांसाठी आयोजित करण्यात आलेल्या एमआयएस विषयक कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कुडाळ येथे पार पडलेल्या या कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. शिंदे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष सुनील राऊळ, सैनिक पतसंस्थेचे अध्यक्ष बाबुराव कविटकर, सहाय्यक निबंधक सुनील मरभळ, लेखापरीक्षक श्रीम. नाईक, श्री. चौगुले, श्री. हिर्लेकर आणि फेडरेशनचे सचिव महेश्वर कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते.

डिजिटल प्रणालीवर भर देण्याचे आवाहन

कार्यशाळेत मार्गदर्शन करताना डॉ. सोपान शिंदे म्हणाले की, “पतसंस्थांनी नियामक मंडळाने लागू केलेल्या निकषांचे काटेकोर पालन करून आर्थिक व्यवहारात सुसूत्रता आणावी. ‘आपले सरकार’ पोर्टलचा प्रभावी वापर आणि आदर्श उपविधींचा स्वीकार केल्यास संस्थांची गुणात्मक वाढ होईल.”

आंबोलीत दोन दिवसीय जिल्हास्तरीय अधिवेशन

जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष सुनील राऊळ यांनी यावेळी महत्त्वाची घोषणा केली. ते म्हणाले, “बदलत्या काळात पतसंस्थांनी आपली विश्वासार्हता जपणे गरजेचे आहे. भविष्यातील आव्हाने आणि सहकार कायद्यातील बदल समजून घेण्यासाठी येत्या २३ आणि २४ मे २०२६ रोजी आंबोली येथे दोन दिवसीय निवासी जिल्हास्तरीय पतसंस्था अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे.” या अधिवेशनात राज्यस्तरीय तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार असून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संस्थांना गौरवण्यात येणार आहे.

‘आपण समाजाचे सेवक’: बाबुराव कविटकर

सैनिक पतसंस्थेचे अध्यक्ष बाबुराव कविटकर यांनी पतसंस्थांच्या सामाजिक भूमिकेवर प्रकाश टाकला. “पतसंस्था सामान्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम करतात. आपण समाजाचे सेवक असून लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणे हीच काळाची गरज आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.

प्रशासकीय मार्गदर्शन

कार्यशाळेत ‘आपले सरकार’ पोर्टलवर लॉगिन कसे करावे, ऑनलाईन सुविधांचा लाभ, माहिती अपलोड करण्याची पद्धत आणि एमआयएस अहवालाचे महत्त्व यावर तज्ज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फेडरेशनचे सचिव महेश्वर कुंभार यांनी केले, तर उपस्थितांचे आभार सहाय्यक निबंधक सुनील मरभळ यांनी मानले. या कार्यशाळेला जिल्ह्यातील विविध पतसंस्थांचे पदाधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.