उपविभागीय अधिकारी,राष्ट्रीय महामार्ग उपविभाग, चिपळूण यांना निवेदन
गुहागर प्रतिनिधी
गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गाच्या विविध समस्यांच्या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी,राष्ट्रीय महामार्ग उपविभाग, चिपळूण यांना निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रीय महामार्ग उपविभाग चिपळूणचे उपअभियंता नाझिम मुल्ला, शाखा अभियंता शाम खुणेकर यांच्याजवळ राष्ट्रीय महामार्ग संदर्भात विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. तसेच यावेळी निवेदन देण्यात आले. निवेदनात पुढे म्हटले आहे की,गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूण ते गुहागर दरम्यान, ५ वर्षापूर्वी सिमेंट काँक्रीट रस्ता रुंदीकरण झाले. जेथे काँक्रीट झाले तेथील रस्ता खडबडीत होणे, खड्डे पडणे असे प्रकार झालेले आहेत. त्यामुळे संबंधित ठेकेदाराने अशा ठिकाणी डांबरीकरण करुन सिमेंट काँक्रीट रस्त्याचे विद्रुपीकरण केले आहे.रस्ता रुंदीकरणात रामपूर ते शृंगारतळी व नंतर गुहागर शासकीय विश्रामगृहापर्यंत काँक्रीटचे रुंदीकरण झाले. या दरम्यान, परंतु संपूर्ण रस्ता खडबडीत झाला आहे. काही ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. वास्तविक काँक्रीट रस्त्यावर काँक्रीटच टाकले पाहिजे होते मात्र, ठेकेदाराने तेवढ्या भागात डांबराचे पँच मारुन आपल्या निकृष्ट कामाचे जणू प्रदर्शनच मांडलेले दिसून येत आहे. तरीसुध्दा काही ठिकाणी रस्त्यावर खड्डे व खडबडीतपणा आहेच. त्यामुळे हा नक्की राष्ट्रीय महामार्ग आहे का…, असा प्रश्न आम्हाला पडला आहे. या रस्त्याच्या दुतर्फा गटार लाईन अर्धवट स्थितीमध्ये असल्यामुळे मुक्या प्राण्यांचा जीव गमवावा लागत आहे, शृंगार तळी बाजारपेठेतील स्ट्रीट लाईट बंद अवस्थेत आहे, पिकअप शेडमध्ये बसण्यासाठी वयोवृद्ध प्रवासी किंवा इतर महिला व पुरुष प्रवाशांना आसन व्यवस्था नाही, देखभाल दुरुस्ती यासाठी गुहागर ते चिपळूण मार्गावर पूर्ण झाडी रस्त्यावर आल्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, एखादा अपघात घडल्यास याला जबाबदार आपणच असाल.
वरील माहिती येत्या आठ ते दहा दिवसात न मिळाल्यास जनहित याचिका दाखल करणार असून याप्रकरणी आपण त्वरित खुलासा व्हावा, वरील संदर्भात निवेदन देताना मनसे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, पत्रकार गणेश किर्वे, विनोद चिपळूणकर उपस्थित होते.










